बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) नोव्हेंबर २०२०मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात २५ नोव्हेंबरला अमित चांदोळे यांचीही चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

धाडी आणि चौकशीनंतर यावरून राज्यात बरंच राजकारण पेटलं होतं. मात्र, नंतर या प्रकरणाची चर्चा थंडावली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचे अधिकार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर दाखल झाले. संबंधित अधिकारी बाहेरील सीसीटीव्ही चेक करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप, बंगल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी एन्ट्री केली नसल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकारी कधी आले आहेत हे मात्र समजू शकले नाही.

काय आहे प्रकरण?

टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला १७५ कोटींच्या कंत्राटासाठी ७ कोटींची लाच देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे सेवानिवृत्त कर्मचारी रमेश अय्यर यांनी २८ ऑक्टोबरला तशी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून १०० पैकी फक्त ७० टक्के गार्ड्स वापरले जायचे. ३० टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. जवळपास दीडशेच्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्यांची रक्कम सगळी टॉप्स ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून समोर आली होती. यापैकी काही रक्कम प्रताप सरनाईक यांना मिळत असल्याचा संशय ईडीला आहे. त्याचा तपास सध्या सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed raids at shiv sena leader pratap sarnaik house in lonavala bmh 90 kjp
First published on: 18-05-2021 at 13:40 IST