कोंबडय़ा काढल्या विक्रीस
अशोक तुपे, श्रीरामपूर
‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’, हे घोषवाक्य राष्ट्रीय अंडे समन्वय समितीने जाहिरातीत वापरले. पूर्वी बाजारात अंडी महाग मिळत होती. पण त्याचेही दर आता कमी झाले. शेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या लेअर पोल्ट्रींची संख्या वाढली आहे. त्याने उत्पादन वाढले. तेलंगणातूनही अंडी येत आहेत. त्यात खाद्याचे दर कोसळल्याने अंडी उत्पादक दुष्टचक्रात सापडला आहे.
दोन वर्षांपूर्वी अंडी उत्त्पादन करणाऱ्या पोल्ट्री फार्मचा व्यवसाय नफ्याचा बनला होता. एका अंडय़ाचा घाऊ क बाजारातील दर चार रुपये ५० पैशांवर गेला होता. उत्पादन खर्च कमी होता. मात्र राज्यात ५०० लेअर पोल्ट्रीचे असलेले फार्म पाच हजारांच्या घरात गेले. शेती परवडत नाही म्हणून दुसरा जोडधंदा म्हणून शेतकरी या व्यवसायाकडे आकर्षित झाले. त्यात दररोज पन्नास ते शंभर अंडय़ांचे उत्पादन करणारे शेतकरीही वाढले. मुक्तगोठय़ांमध्ये अंडी निर्मिती सुरू करण्यात आली. साहजिकच उत्पादनात मोठी वाढ झाली. दररोज अडीच कोटी अंडय़ाची राज्याची गरज आहे. पूर्वी राज्यात एक कोटी अंडी तयार होत असे. दीड कोटी अंडी तेलंगणातून येत असे. आता परिस्थिती बदलली. राज्यातील दैनंदिन अंडी उत्त्पादन हे पावणेदोन कोटींवर गेले. त्यात आता तेलंगणातून पन्नास ते पंच्याहत्तर लाख अंडी येणे सुरूच राहिले. त्यामुळे बाजारात अंडी विक्रीसाठी जादा आली. मात्र मागणी त्या तुलनेत वाढलीच नाही. बाजारात मंदी सुरू झाली.
कोंबडी खाद्याचे बाजारात दर मोठय़ा प्रमाणात वाढले. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मका उत्पादनात मोठी घट झाली. मक्याचे दर उच्चांकी २५३० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले. त्यामुळे कोंबडी खाद्याचे दर १५ ते १६ रुपये किलोवरून २८ ते २९ रुपयांवर गेले. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे प्रतिअंडी उत्पादन खर्च वाढला. पूर्वी प्रतिअंडी उत्पादन खर्च हा २ रुपये ५५ पैसे ते २ रुपये ६० पैसे एवढा होता. आता हा खर्च ४ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. पण घाऊक बाजारपेठेतील अंडय़ाचे दर हे २ रुपये ८० पैसे ते २ रुपये ९० पैशावर आले. एक रुपया २० पैसे तोटा प्रत्येक अंडय़ामागे लेअर पोल्ट्री फार्मच्या चालकांना होत आहे. त्याने अंडी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. सलग सहा महिन्यांपासून तोटा होत असल्याने शेतकऱ्यांनी अंडी उत्पादन थांबवून कोंबडय़ा विक्रीला काढल्या.
अंडी देणाऱ्या कोंबडीची किंमत ३०० रुपये असते. पण आता तेवढा खर्च करुन तयार केलेला पक्षी हा अवघ्या ७५ रुपयांत विकावा लागत आहे. ५ हजार कोंबडी (लेअर पक्षी) क्षमतेच्या पोल्ट्री धारकाला दररोज ५ ते ७ हजार रुपये तोटा होत आहे. हा तोटा सहन करून व्यवसाय सुरू ठेवणे अशक्य झाले आहे. २०१६ ते १८ च्या दरम्यान कच्च्या मालाचे दर कमी होते. अंडी जास्त किमतीला होती. त्यामुळे या उद्योगात अनेक नवीन लोक उतरले. ते आता अडचणीत आले आहेत. पोल्ट्री फार्मचे चालक हे आर्थिक अडचणीत आले असून ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करावे अशी मागणी केली जात आहे.
राष्ट्रीय अंडे समन्वय समितीचे पुणे विभागाचे अध्यक्ष शाम भगत, शेती अभ्यासक व पोल्ट्री फार्मचे सल्लागार दीपक चव्हाण, पोल्ट्रीधारक शशिकांत तिसगे यांच्यासह एका शिष्टमंडळाने नुकतीच पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची भेट घेऊन लेअर पोल्ट्री व्यवसायाला मदत करण्याची विनंती केली. सरकारी कोटय़ातील धान्य वाजवी दरामध्ये देण्याचे आश्वासन मंत्री जानकर यांनी दिले आहे. तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला. मात्र अद्याप केंद्र सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पोल्ट्रीधारक केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा करत आहेत.
तेलंगणचा पोल्ट्री उद्योग सक्षम का?
तेलंगणमधील अंडी व्यवसाय हा खूप जुना आहे. त्यात तेलंगण सरकार पोल्ट्री उद्योगाला मदत करते. १८ रुपये किलो दराने मका पुरवते. तामिळनाडू व तेलंगणमधील शालेय विद्यार्थ्यांच्या आहारात अंडी दिली जातात. तेथे त्यांना बाजारपेठ मिळते. जास्तीचे अंडे ते महाराष्ट्रात पाठवतात. यापूर्वीच तेथील पोल्ट्री फार्म सक्षम झाले असून केलेल्या गुंतवणुकीचा परतावा झाला आहे. आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्याने बाजारातील चढ-उतार पेलण्याची त्यांची क्षमता तयार झाली आहे.
राज्यातील लेअर पोल्ट्री चालकांना तेलंगणच्या धर्तीवर अनुदानित दरात गहू व मका याचा पुरवठा केला पाहिजे. अल्प व दीर्घ मुदतीच्या कर्जाचे पुनर्गठन करावे. केंद्र सरकारने कच्चा माल आयात करण्यास पुरेसा कोटा वाढवून द्यावा. त्याचे नियम करून तातडीने अमलात आणावे. दैनंदिन शालेय पोषण आहारात अंडय़ांचा समावेश करावा. तरच या उद्योगाला ऊर्जितावस्था मिळेल.
– दीपक चव्हाण, पोल्ट्री उद्योगाचे सल्लागार व शेती अभ्यासक, पुणे
अंडय़ाच्या दरात खूपच नीचांक झाला असून एक अंडे २ रुपये ८० पैशाला घाऊक बाजारात विकले जात आहे. श्रावण सुरू झाल्यानंतर अंडय़ाची मागणी एकदम कमी झाली असून दिवसेंदिवस बाजारातील दरातील घसरण सुरू आहे. राष्ट्रीय अंडे समन्वय समिती दररोज अंडय़ाचे दर जाहीर करते. घाऊ क बाजारातील हा दर ३ रुपये ८१ पैसे जाहीर होतो. मात्र प्रत्यक्षात बाजारात २ रुपये ८० पैसे हा दर मिळतो. पूर्वी अशी तफावत नसे. समितीने जाहीर केलेले दर व बाजारातील दर हे एकसारखे असत. उठाव कमी, उत्पादन जास्त, मागणीतील घट यामुळे हे घडले. लेअर पोल्ट्री फार्मचा व्यवसाय त्यामुळे तोटय़ात गेला आहे.
– शशिकांत तिसंगे, लेअर पोल्ट्री फार्म चालक, मालेगाव