सत्ता गेल्यावर भल्याभल्यांना वेगळा अनुभव येतो. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनाही असाच अनुभव येऊ लागला आहे. सत्तेत असताना जिल्हा यंत्रणा खडसेंच्या इशाऱ्यावर चालत होती. गिरीश महाजन पालकमंत्री झाले आणि खडसे यांची पद्धतशीरपणे कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

एकेकाळचे जवळचे सहकारी आणि  जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आता माजीमंत्री एकनाथ खडसेंपासून हातचे अंतर ठेवून आहेत. महाजनांवर कुरघोडी करण्याची एकही संधी खडसे सोडत नाहीत. याचूनच बहुधा जिल्ह्य़ात वेगळाच वाद निर्माण झाला आहे. या वादात राज्याच्या मंत्रिमंडळातील दुसरे ‘गिरीश’ खडसेंच्या मदतीला धावून आले. दोन गिरीश आणि एक खडसे यांच्यातील राजकीय कुस्त्यांच्या डावपेचावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

‘राजा बोले अन् दल हाले’ या म्हणीप्रमाणे खडसे बोले अन् प्रशासन हाले असा दरारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राज्यभरात होता. मात्र आता स्वत:च्या जळगाव प्रशासन खडसेंना जुमानत नसल्याचे गेल्या काही महिन्यांतील घटनांवरून दिसून येत आहे. शालेय पोषण आहार आणि पुरवठा विभागातील गैरप्रकारांबद्दल त्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केल्यानंतरही त्याची दखल न घेतल्याने त्यांनी भुसावळ तालुक्यात रेशन दुकानांना मालाचा पुरवठा करणाऱ्या गोदामावर छापा टाकत घोळ उघडकीस आणला. यावेळी भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे देखील उपस्थित होते. या छाप्यात नागरिकांना रेशन दुकानासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याच्या ५० किलोच्या गोण्यांमध्ये केवळ ४० किलो धान्य आढळून आले. जळगाव धान्य गोदामांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार सुरू असून त्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला. याप्रकरणी त्यांनी अन्न-नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गिरीश बापट यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तक्रार केली. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांकडे त्यांनी तक्रार केल्याने अन्न-नागरी पुरवठा विभागात खळबळ उडाली.

रेशन मालाच्या पुरवठय़ात शंभर कोटीचा घोटाळा असल्याचा आरोप करून खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्यानंतर अन्न-नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट अडचणीत आले. त्यांनी मुंबईतून सूत्रे हलविल्यानंतर मुंबईतील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात दाखल होत गोदामांवर कारवाई केली. यात खडसेंच्या विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर, कुऱ्हा काकोडा येथील गोदामांचाही समावेश आहे.

मात्र या संपूर्ण घडामोडीत जिल्हा पुरवठा विभाग ढिम्म असून जिल्ह्याचे अधिकारी या विषयावर बोलायला तयार नाहीत. आधीच जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहार वाटपातील अनेक गैरप्रकार उघड होत असताना तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी वस्तुस्थिती समोर आणून दिल्यानंतरही चौकशीत संशयितांचा वेळोवेळी बचाव केला जात असल्याने पुरवठा विभाग आधीच संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यावर खडसेंनी शिक्कामोर्तब केले आहे. पोषण आहार, धान्य पुरवठादार गिरीश महाजन यांच्या मर्जीतील असल्याने जळगाव जिल्ह्यात हा घोळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घडामोडींना महाजन-खडसे वादाची किनार आहे.