अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे महायुतीत मंत्रीमंडळ विस्ताराचा पेच निर्माण झाला आहे. आपल्या पारड्यात जास्तीत जास्त मंत्रीपदं मिळावीत, यासाठी भाजपासह शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून हालचाली वाढल्या आहेत. अशा राजकीय हालचाली सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठं विधान केलं आहे. आगामी काळात एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला धोका आहे, असं विधान खडसे यांनी केलं.

खरं तर, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर काँग्रेसमधील काही आमदारही फुटू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुका जिंकल्यामुळे काँग्रेसमधून कोणताही आमदार तिकडे जाईल, अशी स्थिती राज्याता नाही. याउलट कर्नाटकमधील विजयामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये उत्साह वाढला आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची पोकळी काँग्रेस भरू शकते, अशा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे काही महिन्यांसाठी किंवा काही दिवसांसाठी काँग्रेसचे आमदार तिकडे जातील, असं मला वाटत नाही.”

हेही वाचा- “दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे…”, मिटकरींची आव्हाडांवर टोलेबाजी!

जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “भाजपा नेहमीच अफवा पसरवण्याचं काम करते. काही वेळा डाव टाकण्याचाही प्रयत्न करतात. सध्या भाजपा सत्तेसाठी हपापलेली दिसतेय. पक्ष फोडणं हेच देवेंद्र फडणवीसांचं प्रथम कर्तव्य आहे, असं दिसत आहे. स्वतःच्या पक्षावर लक्ष देण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस यांनी अधिक लक्ष दिलं आहे. त्यामुळे काँग्रेस फोडता येईल का? अपक्ष जोडता येईल का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडता येईल का? असं फोडाफोडीचे राजकारण ते करत आहेत. भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टिने हे योग्य नाही.”

हेही वाचा- उद्धव ठाकरेंशी युती करणार का? राज ठाकरे क्षणभर थांबले, मिश्किल हसले अन्……

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांच्या नावाची चर्चा आहे, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले, “भावी काळात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका आहे. एखाद्या वेळी एकनाथ शिंदे हे अपात्र ठरले तर त्यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.”