Eknath Khadse vs Praful Lodha : हनी ट्रॅपसह इतर अनेक गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात प्रफुल्ल लोढा हे नाव पुढ आलं आहे. या लोढावरून विरोधक सरकारवर आणि सरकारमधील मंत्री विरोधी बाकावरील एकनाथ खडसेंवर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे आमदार) आरोप-प्रत्यारोप करत आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा याचे एकनाथ खडसे यांच्याबरोबरचे काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. यासह महाजन यांनी म्हटलं आहे की “एकनाथ खडसे… तुमच्या या ‘गुलाबी गप्पा’ कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय.”
दरम्यान, महाजनांच्या या पोस्टवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाजनांवर आरोपांची झोड उठवत खडसेंनी मानतली खदखद व्यक्त केली आहे. प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात खडसे म्हणाले, “हो, लोढा माझ्याशी बोलत होता. पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे, तर माझ्याबद्दलच्या गोष्टी तो मला सांगत होता.”
खडसेंकडून गिरीश महाजनांच्या चौकशीची मागणी
एकनाथ खडसे म्हणाले, “माझं आता गुलाबी गप्पा मारण्याचं वय राहिलं नाही. मात्र, तुम्ही लोढाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले, त्याच्यावर दबाव आणला, त्याची माहिती मला मिळत होती. तुम्ही आज जिथे आहात ते केवळ फडणवीसांमुळे आहात, अन्यथा तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्याइतकी देखील राहिली नसती. माझ्या पाच चौकशा झाल्या, तुमच्या संपत्तीची पण चौकशी व्हावी. तुम्हाला चालेल का, तेवढा दम तुमच्यात आहे का?
दरम्यान, भाजपामधील आपला प्रवास आणि पक्षाकडून झालेल्या हेटाळणीचा उल्लेख करत खडसे भावनिक झाले. ते म्हणाले, “मी पक्षासाठी आयुष्य खर्च केलं, पण आज ज्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेत ते लोक पक्षात आहेत आणि आम्ही बाहेर फेकले गेलो आहोत. महाजन यांनी मला मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचले आणि जिल्ह्यातील संस्थांवर ताबा मिळवला. मी मंत्रिमंडळात होतो तोवर महाजनांचं वर्चस्व शक्य नव्हतं, म्हणूनच हे सर्व घडलं.
गिरीश महाजन काय म्हणाले होते?
एकनाथ खडसे, तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघडं होतं आहे. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हा तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. २०१९ ते २०२२ च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय?