एकनाथ खडसे यांची खंत; ग्रामसेवकांच्या मेळाव्याला हजेरी

पुरावा नसतानाही शिक्षा होते याचे उदाहरण आपण स्वत: अनुभवले आहे, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेतर्फे   जिल्हास्तरीय मेळाव्यात खडसे यांनी पक्षांतर्गत नेत्यांवर टीका करणे मात्र टाळले.

जळगाव जिल्ह्य़ात भाजपमध्ये एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे गट प्रबळ आहेत. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मागील आठवडय़ात  भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात थेट नाव न घेता पक्षांतर्गत नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते.  त्या मेळाव्यास महाजन उपस्थित नव्हते. राजीनाम्यानंतर प्रथमच ग्रामसेवक मेळाव्यात खडसे आणि महाजन हे एका व्यासपीठावर उपस्थित राहिले. खडसे यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे नेते आमदार गुलाबराव पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे या मेळाव्यात आरोप-प्रत्यारोप रंगतील अशी चिन्हे होती, परंतु तिघा नेत्यांनी वाद टाळले. जे काम करतील त्यांच्याकडून चुका होणारच, असे सूचक वक्तव्य करत कोणाकडून विनाकारण त्रास होईल असे वागू नका, असा सल्ला खडसे यांनी ग्रामसेवकांना दिला. आपल्याविरुद्ध एखादा पुरावा आणला तर समाधान मिळेल असे   म्हणत आहोत. हे आव्हानही कोणी स्वीकारत नाही. तोंड काळे करायला कोणी येत नाही, अशी खोचक टीका खडसे यांनी नाव न घेता अंजली दमानिया, प्रीती शर्मा-मेनन यांच्यावर केली.

चांगले काम करा

महाजन यांनी रज्य व केंद्र सरकारच्या योजना गावात कशा राबवायच्या हे ग्रामसेवकालाच चांगल्या प्रकारे माहीत असल्याने ग्रामसेवकच गाव विकासाचा केंद्रिबदू असल्याचे नमूद केले. आदर्श ग्रामसेवक, आदर्श शिक्षक अशा पुरस्कारांचे वाटप शासनाकडून होत असते. त्यासाठी अनेक जण शिफारशी घेऊन येतात, परंतु असे पुरस्कार आता शिफारशींनी मिळणार नाहीत. त्यासाठी चांगले काम करावे लागेल, असेही महाजन यांनी सुनावले.