राज्यमंत्र्यांना जादा अधिकार देण्याच्या मुद्यावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि राज्यमंत्री संजय राठोड यांच्यातील संघर्ष आता थेट भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील वाद बनला आहे. शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राठोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर शिवसैनिकांनी खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत जशास तसे उत्तर दिले. भाजप-सेनेतील मंत्र्यांमधील वाद आता रस्त्यावर पोहोचल्याचे अधोरेखीत झाले आहे.
आपल्या मंत्र्यांना भाजपकडून विशेष मान दिला जात नसल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली असताना आता मंत्र्यांच्या अधिकारांवरून रंगलेल्या शाब्दीक युध्दाचे पडसाद जळगावमध्ये उमटले. ‘जादा अधिकार मिळविण्यासाठी राठोड यांनी राऊडी राठोड प्रमाणे बालिश वक्तव्य बंद करावे’ असे खडसावत भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्याच्या निषेध केला. जादा अधिकार न मिळाल्यास महसूलमधील अनेक प्रकरणे बाहेर काढू असे वक्तव्य राठोड यांनी जळगाव जिल्ह्यात केले होते. वास्तविक, त्यांना अधिकचे अधिकार हवे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री वा भाजप-सेनेच्या समन्वय समितीकडे तो विषय मांडणे आवश्यक आहे. तथापि, तसे न करता प्रसारमाध्यमांकडे असे विधान करताना राठोड यांना आपण सत्ताधारी पक्षातील मंत्री असल्याचे विसर पडल्याचे टीकास्त्र भाजपने सोडले. राठोड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत भाजपने निषेध केला. या घडामोडीनंतर शिवसैनिकही आक्रमक झाले. त्यांनी थेट खडसेंचा पुतळा दहन करत भाजपच्या कार्यकर्त्यांना महाबालिश ठरवले. राज्यात युतीचे शासन असून राजशिष्टाचारानुसार राज्यमंत्र्यांना जे अधिकार असतात, त्या अधिकारासाठी राठोड यांनी आवाज उठविला आहे. पण, खडसेंपुढे समोर चमकोगिरी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाबालिशपणाचे दर्शन घडविल्याची टीका शिवसैनिकांनी केली आहे.