scorecardresearch

..तर पक्षविरोधी काम केलेल्यांचे पुरावे देऊ

गिरीश महाजनांच्या आव्हानाला एकनाथ खडसेंचे उत्तर

..तर पक्षविरोधी काम केलेल्यांचे पुरावे देऊ
संग्रहीत छायाचित्र

 

विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात करण्यात आलेल्या पक्षांतर्गत कारवायांचे पुरावे आपण पक्षश्रेष्ठींकडे यापूर्वीच सादर केले आहेत. त्यांनी आता परवानगी दिली तर लगेच ते पुरावे नावानिशी पत्रकारांपुढे सादर करेल, असे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले.

शहरात सुरू असलेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय आढावा बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर खडसेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांच्या आवाहनाला थेट उत्तर देण्याचा प्रयत्न केला. भाजपमध्ये कोणीच कोणाला पराभूत करण्याचे उद्योग करीत नाही. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा अ‍ॅड. रोहिणी खडसे तसेच पंकजा मुंडे यांना पक्षातील लोकांनी पाडल्याचा आरोप चुकीचा आहे. खडसेंकडे पुरावा असेल तर त्यांनी नावे जाहीर करावी, असे आव्हान महाजन यांनी दिले होते.

भाजपमधून १२ आमदारांचा गट फुटणार असल्याची चर्चा ही अफवा असून पक्षामधून कोणीही फुटणार नसल्याचा दावा त्यांनी केला होता. पंकजा मुंडे यांनी बंडखोरी रक्तात नसल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा प्रश्न राहिलेला नाही, असेही महाजन यांनी म्हटले होते. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी आढावा बैठकीला खडसे उशिराने आल्याबद्दलही त्यांना कारण विचारण्यात आले. मला साडेतीन वाजताच्या बैठकीसाठी बोलावले होते, त्याप्रमाणे मी वेळेवर हजर झालो आहे. माझी नाराजी वगैरे काही नाही, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर व्यक्त केलेल्या नाराजीबद्दल विचारले असता खडसे यांनी त्याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष आणि श्रेष्ठींकडे मुद्दे मांडले आहेत. ते मुद्दे आपण गिरीश महाजनांनी सांगितल्याप्रमाणे जनतेसमोर मांडू शकतो, त्यासाठी आधी आता बैठकीत प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेतो आणि ते हो म्हणाले तर लगेच तुमच्याकडे ते पुरावे सादर करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या