मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलं आहे. यावेळी तुफान फटकेबाजी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. वर्षभर आमच्या ५० आमदारांना खोके आणि गद्दार म्हणून हिणवलं जातंय. पण, याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे? हे पाहिलं पाहिजे, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “वर्षभर आमच्या ५० आमदारांना खोके आणि गद्दार म्हणून हिणवलं जातयं. पण, याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे? हे पाहिलं पाहिजे. ज्यांनी महाराष्ट्राच्या मतदारांशी, शिवसैनिकांशी आणि आपल्या परिवाराशीही गद्दारी आणि बेईमानी केली. मग ते कोण? या गोष्टी बोलायला मला आवडत नाही.”
हेही वाचा : “जुगाराच्या अड्ड्यावर बसलाय का?” विधानसभेत बच्चू कडूंचा आदित्य ठाकरेंवर संताप, नेमकं काय घडलं?
“आपण ज्यांच्याबरोबर निवडून आलो, त्यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केलं. मग, बेईमानी आणि गद्दार कोणी केली? खूप गोष्टी बोलता येतात. संयम बाळगतो, याचा अर्थ आम्हाला काही माहिती नाही, असं समजू नयेत. अरे आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करतात. रोज शिव्या श्राप देतात. दुसरीकडे आमच्याकडचे ५० कोटी रुपये द्या, म्हणून पत्र देता. खरे खोकेबाजे आणि खोकेबाज कोण?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
“ज्यांना बाळासाहेबांशी, शिवसेनेशी, शिवसैनिकांशी काही देणं, घेणं नाही. फक्त ५० खोक्यांवर त्यांचा डोळा आहे. याचा इतर लोकांनी विचार करावा,” असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील आमदारांना दिला.