शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी गुरुवारी (२९ सप्टेंबर) ठाण्यातील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेत, आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही शक्ती प्रदर्शनाची योग्य जागा नाही, असं म्हणत खोचक टोला लगावला. तसेच बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि विचार कोणी खंडित केले, सत्तेसाठी कोणी तडजोड केली हे सांगण्याची आवश्यकता नाही, असंही मत व्यक्त केलं. ते शुक्रवारी (३० सप्टेंबर) दुर्गेश्वरी देवीचे दर्शना घेण्यासाठी ठाण्यात आले असताना बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाण्यातील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. लाखो भक्त या देवीच्या दर्शनाला येतात. दरवर्षी आम्ही दुर्गेश्वरी देवीची आरती करतो. यंदा सहकुटुंब सहपरिवार आरती केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेही देवीच्या दर्शनासाठी यायचे. ही दुर्गेश्वरी देवीची पुजा करण्याची जागा आहे, शक्ती प्रदर्शनाची नाही.”

“धर्मवीर आनंद दिघे यांनी देवीच्या स्थापना केली. त्यानंतर टेंभीनाकाचा नवरात्रोत्सव अखंडितपणे पुढे घेऊन जाण्याचं काम मी त्यांचा एक शिवसैनिक म्हणून करत आहे,”

ते पुढे म्हणाले, “आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी सुसंगत भूमिका घेऊन पुढे जात आहोत, आणि त्यामुळेच राज्यातील प्रत्येक घटक या भूमिकेला समर्थन देत आहे. बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे विचार कोणी खंडित केले, सत्तेसाठी तडजोड कोणी केली हे सांगण्याची आवश्यकता नाही. योग्य वेळी सगळं सांगेन.”

“देवीची सेवा करत मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलो आहे. देवीचा आशीर्वाद जनतेवर रहावा, राज्यातील शेतकऱ्यांवरचं संकट, रोगराई दूर जाऊदे, असे साकडे देवीच्या चरणी घातले,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : मतभेद आणि शाब्दिक बाचाबाचीच्या चर्चांवर प्रताप सरनाईकांसमोरच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “आम्ही दोघेही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी कुटुंबीयांसह देवीची पूजा करून महाआरती केली. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.