उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी इंडिया टुडे एन्क्लेव्ह या कार्यक्रमात बोलताना केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आदित्य ठाकरेंनी केलेलं विधान शिंदे गट आणि ठाकरे गटादरम्यान नव्या वादाला कारणीभूत ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असताना शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंवर परखड शब्दांत टीकास्र सोडण्यात आलं आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं”, असं आदित्य ठाकरेंनी त्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं.
दरम्यान, या प्रकरणावर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालिशपणा असल्याची प्रतिक्रिया दिलेली असताना त्यावर दीपक केसरकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरेंची एक मुलाखत तुम्ही बघा. त्यात ते म्हणाले की ‘मी एकनाथ शिंदेंना बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी मुख्यमंत्रीपद सोडतो. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते’. हे स्वत: उद्धव ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंना खोटं कसं बोलावं याचं ट्रेनिंग चाललेलं असतं. त्यांनी त्यासाठी एक एजन्सी नेमलेली आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“उद्धव ठाकरे असं बोलले म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल त्यांना आदर नाही. उद्धव ठाकरे जे बोलले, त्याच्या विरुद्ध आदित्य ठाकरे बोलत आहेत. खोटं कसं बोलायचं, याचं एक नवीन उदाहरण महाराष्ट्रात तयार होत आहे. एक नवीन गोबेल्स महाराष्ट्रात तयार होत आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही”, अशा शब्दांत दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं.
संजय राऊतांच्याही विधानावर आगपाखड
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या दाव्याला दुजोरा देणाऱ्या संजय राऊतांनाही केसरकरांनी लक्ष्य केलं आहे. “संजय राऊत कशालाही दुजोरा देतील. ते वाट्टेल ते बोलतात. तेही मुख्य प्रवक्ता आहेत आणि मीही. पण बोलण्याला एक मर्यादा असावी लागते. ती कुणीही सोडू नये. महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठल्या स्तरावर न्यायचं यालाही मर्यादा आहे”, असं ते म्हणाले.
“काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात, मात्र…”; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान!
“महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत की किती खोटारडेपणा महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे. किती खोटं बोललं जातंय. एका सच्च्या शिवसैनिकाची कशी अवहेलना केली जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसोबत कुणी थांबावं एवढीही पातळी त्यांची राहिलेली नाही. खोटं बोलायचं आणि सहानुभूतीने मतं मिळवायची यापलीकडे ते काहीही करत नाही”, अशी टीकाही केसरकरांनी यावेळी केली.