शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी होऊन आता दोन महिने उलटले आहेत. शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी आणि आमदार-खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. शीतल म्हात्रे हे त्यातलंच एक नाव. शीतल म्हात्रेंना शिंदे गटाकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. नुकतीच उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात आता शीतल म्हात्रे यांनी देखील उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. तसेच, शिवसेनेचा उल्लेख ‘शिल्लक सेना’ असा करत खोचक टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील महत्त्वाची घडामोड!

“आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असं म्हणत उद्धव ठाकरेनी संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीचं स्वागत केलं आहे. मात्र, “उद्धव ठाकरेंसोबत आता कुणीही युती करायला तयार नाही, त्यांची अवस्था अशी झालीये की आता ते सैराट मित्रमंडळाशीही युती करतील”, अशा प्रकारची टीका भाजपाकडून केली जात आहे. यावरून राजकारण तापू लागलं असतानाच एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

“संभाजी ब्रिगेड कुणाची बी टीम आहे हे…”

संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप यावेळी शीतल म्हात्रे यांनी केला. “प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेत जातीपातींना कुठेही थारा नव्हता. पण संभाजी ब्रिगेडनं शिल्लक सेनेसोबत युती केली. संभाजी ब्रिगेड कुणाची बी टीम आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. संभाजी ब्रिगेडनं जातीपातींमध्ये तेढ निर्माण करायची आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला अजेंडा सेट करायचा ही जुनी परंपरा आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडला राजकारणातच जायचं होतं, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणं अपेक्षित होतं”, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.

“आता तरी राष्ट्रवादीच्या बोळ्यानं दूध…!”

“या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना मात्र दु:ख झालंय. कारण याच संभाजी ब्रिगेडनं पुण्यातला राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला होता. जेव्हा युतीचं राज्य असताना महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरेंना देण्याचं जाहीर झालं होतं, तेव्हा याच संभाजी ब्रिगेडनं त्याला विरोध केला होता. आता शिल्लक सेनेमध्ये जी काही राजकीय उलथापालथ सुरू आहे, त्यामुळे असं वाटत होतं की आता तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बोळ्यानं दूध पिणं बंद होईल. पण तसं काही झालेलं दिसत नाही. त्यामुळेच पुढच्या काळात शिवसेनेत पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण होतंय की काय, हे बघण्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे”, असं शीतल म्हात्रे यावेळी म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde group shital mhatre on shivsena alliance with sambhaji brigade pmw
First published on: 27-08-2022 at 13:56 IST