पंढरपूर : इथे फक्त वारकरी व्हीआयपी आहेत. वारकऱ्यांना अधिकच्या, दर्जेदार सुविधा देणे, त्यांची सुरक्षित वारी होणे याला सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तर मंदिरापर्यंत पायी जात शिंदे यांनी केवळ मुखदर्शन घेतले. तसेच ताफा न वापरता चक्क आमदार समाधान आवताडे यांच्या बुलेटवर बसून यात्रेच्या कामाची पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चांगले काम केले म्हणून कौतुक केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धावत्या दौऱ्यात वारकरी आणि प्रशासनाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतलेली दिसून आली. या वेळी त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार समाधान आवताडे उपस्थित होते. शिंदे यांनी दर्शन रांगेतील भाविकांचे दर्शन थांबवून पदस्पर्श दर्शन न घेता त्यांनी मुखदर्शन घेतले. यावेळी मंदिरातील पुरातत्त्व विभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माहिती दिली. तसेच त्यांचा मंदिर समितीने सत्कार केला.
या नंतर येथील शासकीय विश्रामगृह येथे शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेली दोन वर्षे आम्ही वारकऱ्यांना अनेक सुविधा दिल्या. या वर्षी देखील याची पाहणी करण्यासाठी आलो. यंदा स्वच्छता दिसून आली. जागोजागी दिसणारे फलक गायब झाले.
जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांनी यंदा अधिकच्या सुविधा दिल्या, असे त्यांनी सांगितले. अर्बन नक्षलवादाबाबत बोलताना ते म्हणाले की, लाखो वारकरी सुरक्षित वारी करून घरी जावेत, वारी सुखरूप व्हावी ही जबाबदारी सरकारची आहे. गृह विभाग योग्य ती काळजी घेत असून सतर्क झाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच यंदा चांगला पाऊस पडू दे, अशी प्रार्थना केल्याचे शिंदे यांनी सांगितले. तर लोकशाहीमध्ये सर्वांना हक्क आहे. कोणाबरोबर युती, आघाडी करायची तो त्यांचा निर्णय असून त्यांना शुभेच्छा असे म्हणत राजकीय भाष्य करणे टाळले. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी यात्रेचे चांगले नियोजन केल्याबद्दल सत्कार केला.
बुलेटवर बसून पाहणी
विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन बंदी केलेल्या नियमाचे पालन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मंदिरात दर्शनाला जाताना मोजकेच कार्यकर्ते सोबत होते. तर मंदिराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असल्याने शिंदे यांच्या सह दोन मंत्री पायी मंदिरात गेले. तसेच यात्रेची पाहणी करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या बुलेटवर बसून शिंदे यांनी पाहणी केली.