कुणाल कामरा प्रकरणी सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. त्याच्यावर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिले. दरम्यान, कुणाल कामरावर कारवाई होणार असल्याने विरोधकांनीही याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. आदित्य ठाकरेंनी कुणाल कामराची बाजू घेतली असून त्याने कोणाचंही नाव घेतलेलं नसताना त्याच्यावर कारवाई का व्हावी, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या महिला प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनीही आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. त्या आज विधानभवनातून टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

“सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना रिक्षावाला मुख्यमंत्री बनल्याचं पाहवत नाहीय. शेतकऱ्यांचा मुलगा रिक्षावाला माणूस मुख्यमंत्री झाला हे पचनी पडत नाही. त्यामुळे कोणीतरी कॉमेडियन तयार करून बोलायला लावायचं. उद्या आम्हीही त्यांच्या घरात जाऊन अशाच शिव्या देतो आणि संविधान दाखवतो. अनेक व्यंगचित्रकार, कलाकार विविध माध्यमातून टीका करत असतात. पण कुणाल कामराने दबक्या आवाजात शिवीही दिलीय”, असं मनीषा कायंदे म्हणाल्या.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी कुणाल कामराचं समर्थन केल्याचं विचारल्यावर मनीषा कायंदे म्हणाल्या, “मग मलिष्काने गाणं केलं होतं तेव्हा तुम्हाला का झोंबलं होतं? तेव्हा मिर्च्या का लागल्या. कंगना रणौत हिचं घर तोडलं होतं, ते का तोडलं होतं? याचं उत्तर द्यावं. कुणाल भामट्यामागे तुम्हीच आहात याचा तुम्हीच पुरावा देत आहात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे म्हणाले, “मला वाईट याचं वाटतं की एकनाथ शिदेंच्याच कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच. कारण, कुमाल कामराने नाव कोणाचंही घेतलं नव्हतं. मग त्यांना मिर्ची लागायचं कारणच नव्हतं. पण त्यांनी ठरवंलय की आपला बॉस गद्दार आणि चोर आहे.”