Naresh Mhaske Reaction on Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्याकरता महाराष्ट्र सराकरकडून प्रयत्न सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला पोहोचले आहेत. इंडिगोच्या अतिरिक्त विमानातून या प्रवाशांना महाराष्ट्रात आणलं जात आहे. दरम्यान, त्यांच्या या सहकार्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरून आता जोरदार चर्चा सुरू झाली असून त्यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे.

आज माध्यमांना माहिती देत असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. नरेश म्हस्के म्हणाले, काश्मीरमधून महाराष्ट्रात परतणाऱ्या लोकांमध्ये ४५ लोक वर्धा आणि नागपूरचे आहेत, जे तिथे रेल्वेने गेले होते. सीरआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदें यांनी केली आहे.”

“एकनाथ शिंदे तिथे गेल्याने अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं, काम करण्याची स्फूर्ती वाढली. एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणता. ४५ लोक रेल्वेने गेले होते, पहलगाममध्ये अडकले, सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. त्यांच्या खाण्याचे वांधे होते. त्या लोकांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणलं, ते लोक पहिल्यांदा विमानात बसणार आहेत”, असंही नरेश म्हस्के म्हणाले.

विजय वडेट्टीवारांची टीका

त्यांच्या प्रतिक्रियेवरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “गरज नसताना उपमुख्यमंत्री यांनी काश्मीरवारी केली. इथवर न थांबता तुम्ही कसे गेले, कशी मदत केली याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले अशी भाषा करतात? महायुती सरकार मधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे! किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणे सोडा.”