मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावरून छगन भुजबळांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही छगन भुजबळांना अप्रत्यक्षपणे सूचक इशारा दिला आहे.

“कुणीही अन्य किंवा ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करू नये,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. “ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “ओबीसी समाजाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. ‘ओबीसी किंवा अन्य समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार,’ अशी भूमिका सरकारनं मांडली होती. त्यामुळे कुणीही अन्य किंवा ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करू नये. कुणबी दाखल्यावरून शिंदे समिती आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. तर, क्युरेटिव्ह पिटीशन माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळेल.”

हेही वाचा : “काळ मोठा कठीण आला आहे..राज्य अडाणी लोकांच्या..”, संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया

“छगन भुजबळांनी संभ्रम निर्माण करू नये”

मंत्री शंभूराज देसाई यांनीही छगन भुजबळांना सुनावलं आहे. “ओबीसी समाजानं कुठेही गैरसमज करून घेण्याचा प्रयत्न करू नये. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही. हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळांनी अशाप्रकारची वक्तव्ये करून जाती-जातींतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये,” असं देसाईंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “ओबीसींचे नेते आमच्याविरोधात षडयंत्र रचत आहेत, सरकारने जर…”, मनोज जरांगे पाटील यांचा आरोप आणि इशारा

“भडक वक्तव्ये करून भुजबळांनी परिस्थिती चिघळवू नये”

“भडक वक्तव्य करण्याची सवय छगन भुजबळांना आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याची परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली आहे. सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. अशातच भडक वक्तव्ये करून परिस्थिती भुजबळांनी परिस्थिती चिघळवू नये,” असेही शंभूराज देसाईंनी म्हटलं.