मराठवाड्यातले आठ जिल्हे, सोलापूर या ठिकाणी अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. लोकांच्या घरांचं, पिकांचं नुकसान, गुरांचं नुकसान झालं आहे. आता शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्नच आ वासून उभा आहे. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी व विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. मुसळधार पावसामुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी जसा माध्यमांशी संवाद साधला तसाच एकनाथ शिंदेंनीही साधला. एकनाथ शिंदे यांनी आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन दिलं आहे.
महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. अनेकांनी आम्हाला सांगितलं की अशा प्रकारचा पाऊस गेल्या कित्येक वर्षात पडला नाही. शेतकरी खचून गेले आहेत. मात्र आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पूर्ण पाठिशी उभे आहोत. ज्यावेळी आपत्ती किंवा असं संकट आलं आहे तेव्हा सरकार उभं राहिलं आहे. आज कॅबिनेटमध्येही चर्चा झाली. सरकार मदत करताना हात आखडता घेणार नाही.
शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही-शिंदे
६० लाख हेक्टर जमिनींवरील पिकांचं नुकसान झालं आहे असं समोर आलं आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत किती नुकसान झालं ते समोर येईल. शेतकऱ्यांच्या नुकसानाची माहिती आल्यानंतर मी, मुख्यमंत्री आणि अजित पवार आम्ही सगळे एकत्र मिळून शेतकऱ्यांबाबत हिताचा निर्णय घेऊ. अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. खायला घरात अन्न अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकरी सन्मान योजना मोदींनी सुरु केली. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. सगळ्यांनाच मी आवाहन करतो आहे की जे जे करता येईल ते सगळं करा. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन किती नुकसान झालं आहे त्याचा आढावा आम्ही घेतला. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पुस्तकांचं नुकसान झालं आहे. ती देखील आम्ही पुरवू. आरोग्य विभागाचं पथकही त्या ठिकाणी पोहचलं आहे. खासगी डॉक्टरही त्या ठिकाणी गेले आहेत. त्यांचं योगदान देत आहे. आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहे आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.