Eknath Shinde On Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol : पुणे शहरातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरून शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रवींद्र धंगेकर हे दररोज मोहोळ यांच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत, यामुळे महायुतीतील दोन पक्षांमध्ये तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर यांच्यावर पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदेंनी यावर भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. याबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, “रविंद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केलं होतं, आजही करतो की प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये बेबनाव होईल असे कृत्य, वक्तव्य करू नये.”
पुढे मुरलीधर मोहळांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून रविंद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करणार का? असा थेट प्रश्न माध्यम प्रतिनिधिंनी विचारला असता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “धंगेकरांकडे जो पक्षाचा निरोप जायचा होता तो गेला आहे. धंगेकरांचे जे काही वक्तव्य आहे त्यासंबंधी मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतीलही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
धंगेकराचे आज पुन्हा आरोप
आज रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप एक पोस्ट केली आहे. या एक्सवरील पोस्टमध्ये निवडणुकीतील प्रतिज्ञापत्र जोडत मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असल्याचा दावा धंगेकरांनी केला आहे. तसेच पोस्टच्या शेवटी एक मोठा इशाराही धंगेकरांनी दिला आहे.
“अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे. मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटल की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर १३ केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूकच करत असतो, हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे. बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात..!” असे धंगेकर म्हणाले आहेत.
