Eknath Shinde and Ajit Pawar Press Conference : भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आज भाजपा विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत सर्वांच्या सहमतीने फडणवीस यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. तसेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. पाठोपाठ फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत उद्या होणारा शपथविधी व सत्तास्थापनेबाबतची माहिती दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या, तसेच एकनाथ शिंदे व अजित पवारांनी एकमेकांना चिमटे काढले.

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं की उद्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुम्ही आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहात का? यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “थोडं थांबा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल”. तर, अजित पवार म्हणाले, “थोडी कळ काढा, त्यांचं संध्याकाळी समजेल, मी तर उद्या शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही”. अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिंदे यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “अजितदादांना अनुभव आहे. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचा, त्याचबरोबर सकाळी शपथ घेण्याचा देखील अनुभव आहे”. शिंदेंच्या या टिप्पणीवर अजित पवार कुरघोडी करत म्हणाले, “मागच्या वेळी आम्ही दोघांनी (मी व देवेंद्र फडणवीस) सकाळी शपथ घेतली होती. परंतु, त्यावेळी सरकार चालवायचं राहिलं होतं. यावेळी पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार चालवणार आहोत”.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : नव्या सरकारच्या शपथविधीची निमंत्रण पत्रिका जारी, फडणवीसांबरोबर कोण कोण शपथ घेणार?

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

त्यानंतर, एकनाथ शिंदे म्हणाले, “सगळ्यांनी थोडी कळ काढा. संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या मनातला गोंधळ दूर होईल. उद्या पाच वाजता शपथविधीला हजर व्हा. तिथे तुम्हाला सगळ्या बातम्या मिळतील. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शिफारस केली होती. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही शिफारसपत्र दिलं आहे. मी साधा गावी गेलो तरी तुम्ही तुमच्या चर्चा चालवत असता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होतंय याचा मला आनंद आहे”..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंना मंत्रीमंडळात राहण्याची फडणवीसांकडून विनंती

“मी एकनाथ शिंदेंना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रीमंडळात राहावं. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे आम्ही तिघे व आमच्या पक्षाचे इतर नेते, मित्रपक्ष असे मिळून चांगलं सरकार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न आम्ही करू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.