शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नागपूर येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हटलं होतं. त्यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंगळवारी (११ जुलै) अनेक नेत्यांनी त्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, २०१९ ला ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं, ज्यांनी बाळासाहेबांच्या नावाला कलंक लावला त्या कलंकित लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकांवर कलंक असल्याचा आरोप करणं हे हास्यास्पद आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन दिसून येतंय की, त्यांच्या राजकारणाची पातळी किती खाली घसरली आहे. यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला आठवतंय की, अनेकदा उद्धव ठाकरे अडचणीत असताना आणि देवेंद्र फडणवीस त्या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती. याची ठाकरे यांनी जाणीव ठेवली पाहिजे.

हे ही वाचा >> “…म्हणून २०१४ ला राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली”, भुजबळांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७९ चे माजी नगरसेवक सदानंद परब, प्रभाग क्रमांक १५७ चे डॉ. रवींद्र म्हस्के आणि डॉ. सविता रवींद्र म्हस्के यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचिती केली.