Eknath Shinde and Anandraj Ambedkar Made an Alliance : महाराष्ट्रात काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका जाहीर होण्याआधीच उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षाशी युती केली आहे. एकनाथ शिंदे व आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली आहे.
याप्रसंगी आनंदराज आंबेडकर म्हणाले, “ही युती आजची नाही. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासूनची युती आहे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय व सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन कार्यकर्ते एकत्र आलेलो आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्याला देखील सत्तेचा लाभ हवा यासाठी आम्ही दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
…म्हणून आमचं दोघांचं चांगलं जमेल : एकनाथ शिंदे
आनंदराज आंबेडकर व एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (शिंदे) व रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आमची शिवसेना व आनंदराज यांची रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या या दोन सेना आहेत. एक हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपणारी तर, दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा सांगणारी सेना आहे. त्यामुळे आम्हा दोघांचं चांगलं जमेल असं मला वाटतंय.”
उपमुख्यमंत्री म्हणाले, “मी नेहमीच कॉमन मॅन म्हणून राज्यात काम केलं आहे. एक कार्यकर्ता म्हणूनच मी वावरतो. मुख्यमंत्री असतानाही तशाच पद्धतीने काम केलं. आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. तर मी डीसीएम म्हणजेच डेडीकेटेड टू कॉमन मॅन या भूमिकेत आहे. मी नेहमीच कॉमन मॅन म्हणून राज्यात काम केलं आहे. एक कार्यकर्ता म्हणूनच मी वावरतो. मुख्यमंत्री असतानाही तशाच पद्धतीने काम केलं आहे. आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. तर मी डीसीएम म्हणजेच डेडीकेटेड टू कॉमन मॅन या भूमिकेत आहे. तर, आनंदराज आंबेडकर यांनी साधी राहणी उच्च विचारसरणी हे ब्रीद पाळलं आहे. त्यांची एकच भूमिका, एकच तळमळ आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा, त्याला जनसेवेची संधी मिळावी. यासाठी सत्ता देखील मिळाली पाहिजे. सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते. लोकांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो.