विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने प्रचाराचा धडाका चालवला असतानाच या निवडणुकीत प्रथमत:च शिक्षक आणि पदवीधरांच्या संघटनांचे वलय क्षीण झाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे भाजपचे उमेदवार असल्याने सत्तारूढ पक्षासाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. ‘नुटा’सह व्यावसायिक संघटनांच्या भूमिका अजूनही उघड झालेल्या नसताना या निवडणुकीच्या निमित्ताने बरेच संदर्भ बदलले आहेत. ३५ दिवसांमध्येच आतापर्यंतची सर्वाधिक दोन लाखांपेक्षा जास्त झालेली मतदार नोंदणी कुणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग पाच वेळा निवडून आलेल्या प्रा. बी.टी. देशमुखांचा पराभव धक्कादायक ठरला होता. यात सलग तीन दशकांचा संघटनात्मक प्रभाव बाजूला सारून पक्षीय वर्चस्वाचे एक वर्तूळ पूर्ण झाले होते. आता मात्र शिक्षक आणि पदवीधरांच्या संघटनांच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

मतदारांची संख्या या वेळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागात एकूण १ लाख ६७ हजार ६२८ मतदारांची नोंदणी झाली होती. या निवडणुकीसाठी ही जुनीच यादी गृहीत धरण्यात आली होती. पण या यादीवर आक्षेप घेण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला. १ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या अल्प कालावधीत मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांसह उमेदवारांनीही जोरदार प्रयत्न केले.

chart

मतदारांची वाढलेली संख्या ही प्रमुख राजकीय पक्षांसाठी फायद्याची मानली जात असली, तरी मतदारांचा कल ओळखणे कठीण होऊन बसले आहे. अमरावती विभागात ‘नुटा’ आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांच्यात १९८० पासून एक अलिखित करार झाला होता. त्यात अमरावती पदवीधर मतदारसंघात ‘विमाशिसं’ उमेदवार उभा न करता, ‘नुटा’च्या उमेदवाराला पाठिंबा देईल आणि शिक्षक मतदारसंघात ‘नुटा’ उमेदवार न करता ‘विमाशिसं’च्या उमेदवाराला समर्थन देईल. या संयुक्त करारामुळे २०१० च्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा एक अपवाद वगळता अमरावती विभागातून ‘नुटा’चे प्रा. बी.टी. देशमुख १९८० पासून सलग पाच वेळा निवडून आले होते. मात्र, शिक्षक मतदारसंघात बी.टी. यांच्या प्रमाणे एकाही उमेदवाराला असे घवघवीत यश मिळाले नाही. २०१० च्या निवडणुकीआधी ‘विमाशिसं’मध्ये फूट पडून माजी आमदारद्वय विश्वनाथ डायगव्हाने आणि वसंत खोटरे, असे दोन गट पडले. संघटनेमधील दुहीचा मोठा फटका प्रा. बी.टी. देशमुख यांना बसला होता.

यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय खोडके यांच्यासह प्रहारचे डॉ. दीपक धोटे, स्वतंत्र उमेदवार डॉ. अविनाश चौधरी, डॉ. लतीश देशमुख हे लढाईसाठी सज्ज झाले आहेत. डॉ. रणजित पाटील यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली किती आश्वासने पूर्ण झाली. त्यांनी मतदारसंघासाठी किती वेळ दिला. त्यांचे विभागाच्या विकासात योगदान काय, असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. संजय खोडके यांच्यासह विरोधी उमेदवारांच्या प्रचाराचाही तो आधार बनला आहे.

डॉ. रणजित पाटील यांचा पराभव ही सरकारसाठी मोठी नामुष्की ठरणार असल्याने या निवडणुकीवर मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकादेखील महत्त्वाची ठरणार आहे.

शिक्षकांची मोठी संघटना असलेल्या ‘नुटा’ने अजूनही आपली भूमिका उघड केलेली नाही. संघटनेसमोरही मोठा पेच आहे. आजवर काँग्रेसने ‘नुटा’ला पाठिंबा दिला, त्याची परतफेड करण्याची ही संधी असली, तरी पाठिंब्याबाबत मतैक्य होत नसल्याने संजय खोडके यांच्या गटात अस्वस्थता आहे. पण, ‘नुटा’ पाठिंबा देईल, असा विश्वास संजय खोडके यांच्या गटाला आहे. यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, आयटीआय निदेशक संघटनासंह इतर सहकारी संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आपली ताकद दाखवून देण्याची ही संधी असल्याचे संघटनांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.