सातारा : पुष्प पठार कासचा हंगाम सुरू असून, पठारावर फुलांचे गालिचे बहरले आहेत. हा निसर्गाचा अलौकिक नजारा पाहण्यासाठी हजारो पर्यटक कासला भेट देत आहेत. या पर्यटकांसाठी वन विभाग व कास समितीमार्फत लवकरच चार नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होणार आहेत. यामुळे निसर्ग पर्यावरणासाठी संवेदनशील असलेल्या या भागाचे जतन राखणे सोपे होणार असून यामुळे पर्यटकांची ने – आणही सुलभ होणार आहे.

वन विभाग व कास समितीच्या वतीने ही चारही वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या वाहनांमध्ये पर्यटकांना बसण्यासाठी थोडी सुधारणा करावी लागणार आहे. एका वाहनात आठ ते दहा प्रवासी क्षमता असणार आहेत.

राजमार्गावरील कार्यालय ते कुमुदिनीच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुमुदिनी तलावापर्यंत ही वाहने पर्यटकांची ने-आण करणार आहेत. कुमुदिनी तलाव हा मुख्य रस्त्यापासून तीन ते चार किलोमीटर दूर अंतरावर आहे. तिथे पर्यटकांना पायी चालत जावे लागते. एवढे अंतर चालत जावून माघारी येणे महिला, लहान मुले, वृद्ध पर्यटक यांना त्रासदायक ठरत असल्याने ही वाहने सोयीची ठरणार आहेत.

याच मार्गावर समितीच्या वतीने नुकतीच बैलगाडीची सफर सुरू करण्यात आली आहे. जांभ्या दगडाचा असणारा हा रस्ता कच्चा असून, या मार्गावर मजबूत वाहनांची गरज होती, त्या दृष्टीने ही वाहने या मार्गावर व्यवस्थित चालणार आहेत. लवकरच या वाहनातून पर्यटकांना आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य पाहत कुमुदिनी तलावापर्यंतची सफर करता येणार आहे. या नव्या वाहनांमुळे निसर्ग पर्यावरणासाठी संवेदनशील असलेल्या या भागाचे जतन राखणे सोपे होणार असून यामुळे पर्यटकांची ने – आणही सुलभ होणार आहे.

प्रदूषणमुक्त प्रदेश

कास पठारावरून बामणोलीकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर वाहने नियमित असतात. पठारावरील प्रदूषण टाळण्यासाठी हंगाम काळात सरसकट वाहनांना प्रवेश दिला जात नाही. घाटाई फाट्यावरील वाहनतळामध्ये वाहने लावून पर्यटक कास पठारावर समितीच्या बसने येत असतात. काही वाहने कास तलावाजवळील वाहनतळावर उभी केली जातात. तरीही पठारावर वाहनांची गर्दी होत असते. राजमार्ग ते कुमुदिनी तलाव हा परिसर आतापर्यंत वाहनांपासून मुक्त असून, प्रदूषण ही या ठिकाणी होत नाही. त्यामुळे हा परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी या मार्गावर ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.