सावंतवाडी : गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील बागायतींचे नुकसान करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीने मुंबई-गोवा महामार्ग परिसरातील इन्सुली भागात ठाण मांडले आहे. या हत्तीने शनिवारी सायंकाळी आणि रविवारी सकाळी महामार्ग ओलांडला. परिणामी दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. त्याला पाहण्यासाठी झालेली नागरिकांची गर्दी आणि ठप्प पडलेली वाहतूक, यातून वनविभागाला या हत्तीला मार्ग काढून देताना मोठी दमछाक करावी लागली.
कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून सुमारे २२ वर्षांपूर्वी आलेल्या हत्तींच्या कळपातील १० ते १२ वर्षीय ‘ओंकार’ हत्ती दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे परिसरात दाखल झाला होता. तेथून त्याने गोवा राज्यात प्रवेश केला आणि पुन्हा फिरून सावंतवाडी तालुक्यातील कास, मडुरा, रोणापाल भागांमध्ये त्याचा वावर वाढला. शनिवारी सायंकाळी तो थेट मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली गावात दाखल झाला. इन्सुलीच्या भरवस्तीतील
कुडवतेंब, सावंतटेंब येथून हा हत्ती निघून गेला, मात्र रविवारी सकाळी सुमारे ७ वाजता ‘ओंकार’ पुन्हा महामार्गावर आला. तेरेखोल नदी पात्रात जाण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु महामार्गावरील प्रचंड गर्दी आणि वाहतुकीमुळे अडथळा निर्माण झाला. अखेर सकाळी नऊच्या सुमारास तो तेरेखोल नदी पात्रात उतरून लगतच्या बागायतीमध्ये गेला.
वनविभागाचे हत्तीच्या हालचालींवर लक्ष
‘ओंकार’ हत्ती माणसाळला असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून कास, मडुरा, रोणापाल या गावांमध्ये ‘ओंकार’ने धुमाकूळ घातला होता. लोकवस्ती आणि शेती-बागायतींमध्ये त्याच्या वाढलेल्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, या हत्तीचा वावर महामार्गावर वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच वनविभागाचीही तारांबळ उडत आहे. वनविभागाचे पथक या हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून, त्याला सुरक्षित अधिवासात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
