पुण्यातील एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी पहाटे पासून पुणे, नागपूर या शहरांमध्ये छापेमारी केली. कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर तसेच नक्षलवाद्यांचे खटले लढवणारे वकील अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकण्यात आले. या कारवाईबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. याचे पडसाद राज्यात उमटले व राज्यातील दलित संघटनांनी ३ जानेवारी रोजी राज्यभरात बंदची हाक दिली. या घडामोडीनंतर पोलिसांनी कबीर कला मंचच्या चार आणि रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
जवळपास तीन महिन्यानंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी पहाटे पासून छापेमारीला सुरुवात केली. पुणे, नागपूर तसेच मुंबईतही छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी नेमके कुठे छापे टाकले याचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथर आणि अॅड. गडलिंग यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहे. गडलिंग यांचे घर नागपूरमध्ये असून त्यांच्या घरात पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप तपासले जात आहेत. पुण्यात वाकड येथे रमेश गायचोर आणि सागर गोरखेच्या घरी पहाटे घरावर पोलिसांनी छापा टाकला.