सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे व उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. जुना खंबाटकी टोलनाका परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये सुमारे वीस हॉटेल, टायर दुकान, पानटपऱ्यांचे असलेले अतिक्रमण रस्ते प्राधिकरण विभागाने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रस्ते प्राधिकरणाकडून खंबाटकी घाटानजीक नवीन दोन बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंडाळ्यानजीक रस्ता रुंदीकरणात येणारी हॉटेल व छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, संबंधित व्यावसायिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी प्रशासनाने रस्त्यामध्ये येणाऱ्या इमारती, टपऱ्यांवर हातोडा मारला.

प्रकल्प संचालक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एम. टेक, एस. एस. कदम, रस्ते प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी राम लथाड, तांत्रिक व्यवस्थापक अंकीत यादव, सुभाष घंटे, वरिष्ठ अभियंता लक्ष्मण पाटील, पी.एस. टोल प्लाझा, गायत्री इन्फ्रास्ट्रक्चर, सेगमेंट यांच्या उपस्थितीत २००८ ला संपादित जमिनीत असणारी अतिक्रमणे काढण्याचे काम प्रगतीपथावर होते. या परिसरात नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने महामार्गाच्या कडेला अधिग्रहीत जागेत झालेल्या अतिक्रमणाबाबत संबंधितांना अनेकदा अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती. काही जागामालकांनी योग्य मोबदला मिळावा, यासाठी मागणी केली होती. मात्र, त्यावर काही निर्णय झाला नसल्याने शेतकरी गाफील राहिले. दि. २५ ऑगस्ट रोजी प्रशासनाने अंतिम नोटीस पाठवून ७ दिवसांत अतिक्रमण काढण्यास लावले होते. मात्र शेतकरी, जागामालक यांनी हे अतिक्रमण स्वतःहून काढले नाही. सकाळपासून धडक कारवाई करत अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. यावेळी खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ वादाचे प्रसंग वगळता ही मोहीम शांतपणे राबवण्यात आली.