उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पात्रतेत बदल करतानाच राष्ट्रीय शिक्षक परिषदेने विज्ञान-अभियांत्रिकी पदवीधरांना संधी दिली असून प्राथमिक शिक्षणात प्रथमच अभियांत्रिकीचा समावेश करून काठिण्य पातळी उंचावली आहे. मोफ त शिक्षणाचा अधिकार अस्तित्वात येण्यापूर्वी शिक्षकांनी किमान पात्रता बारावी उत्तीर्ण एवढीच होती. आता ती किमान पदवीधर करण्यात आली आहे. सोबतच डी. एड., बी.एड. अत्यावश्यक. पदवीधर शिक्षक कोणत्या विषयात पदवीधर आहे, ही बाब पूर्णत: दुर्लक्षित होती. परिणामी, मराठी विषयातील पदवीधर गणित विषय शिकवित असे. आता नव्या आदेशाने याला पूर्णविराम मिळेल.
१३ ऑक्टोबरच्या आदेशान्वये उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, भाषा आणि सामाजिकशास्त्रे या संवर्गातील प्रत्येकी एका विषयातील पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. विज्ञान विषय संवर्गात गणित, विज्ञान किंवा अभियांत्रिकी विषयातील पदवीधर शिक्षक नियुक्त होणे अनिवार्य आहे. अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर अपेक्षित आहे का, याविषयी विचारणा केल्यावर शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी तसा अर्थ नसल्याचे स्पष्ट केले.
विज्ञान शाखेची पदवी घेताना भौतिक, रसायन व जीवशास्त्र हे विषय प्रामुख्याने समाविष्ट असतात, पण बी.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायंस वगैरे) विषयातील नव्याने समाविष्ट विषयाच्या पाश्र्वभूमीवर हा महत्त्वाचा बदल प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी करण्यात आला आहे. आता विज्ञानात अभियांत्रिकीचाही समावेश झाला असून भाषा संवर्गात मराठी इंग्रजी, हिंदी, उर्दू व अन्य, तसेच सामाजिकशास्त्र संवर्गात इतिहास व भूगोल यांचा समावेश झाला आहे.
सहावी ते आठवीच्या वगार्ंना शिकविणाऱ्या शिक्षकांपैकी एक तृतीयांश शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा नवा बदल आता करण्यात आला आहे.
यापूर्वी एक चर्तुथांश पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी मिळत होती. या वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या तीनपेक्षा अधिक व पदवीधर वेतनश्रेणी लागू असणाऱ्या शिक्षकांची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास सेवाजेष्ठतेचा निकष लागेल. म्हणजेच, एखाद्या संस्थेतील तीन शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देय ठरत असल्यास प्रत्येक विषय समूहातील एकाच शिक्षकास पदवीधर वेतनश्रेणी मिळेल.
बारावी उत्तीर्ण पात्रता असणाऱ्या शिक्षकांनी सेवेत असताना पदवी प्राप्त केली असेल तर त्यांनाही पदवीधर शिक्षक समजण्यात यावे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांची सेवाजेष्ठता ठरेल. विज्ञान विषय समूहातील शिक्षकांची संख्या कमी असण्याच्या पाश्र्वभूमीवर बारावीत विज्ञान विषय असणाऱ्यांना मुक्त विद्यापीठाची पदवी घेण्यासाठी प्रवृत्त करावे.
हे सूत्र मान्य नसणाऱ्या शिक्षकांकडून तसे लेखी लिहून घ्यावे, असेही या आदेशात नमूद आहे. अभियांत्रिकीचा समावेश व सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतनश्रेणी, असा बदल करणारा हा नवा निर्णय प्राथमिक शिक्षणात मोठा बदल घडण्याचे संकेत समजला जातो.
बदलत्या अभ्यासक्रमाच्या पातळीवर निर्णय
विज्ञान महाविद्यालयात पदवी पातळीवर अभियांत्रिकी विषय शिकविले जातात. त्यापैकी एक विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी (बी.एससी.) घेणाऱ्यासही नियुक्त करता येईल. बदलत्या अभ्यासक्रमाच्या पातळीवर हा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांना शिकविताना अभ्यासक्रमात नव्या संज्ञा आल्या आहेत म्हणून प्रथमच अभियांत्रिकीचा उल्लेख करण्यात आला.
– गोविंद नांदेडे, शिक्षण संचालक