गंगाखेड शुगर्सच्या ३२८ कोटींच्या महाकर्ज घोटाळ्यातील मुख्य आरोपी उद्योजक रत्नाकर गुट्टे शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणी पोलिसांसमोर हजर झाले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी तब्बल तीन तास चौकशी करून गुट्टे यांचा जबाब नोंदविला.
गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे, संचालक, प्रशासकीय अधिकारी व संबंधित पाच बँकाविरोधात शेतकऱ्यांच्या नावाने ३२८ कोटी रुपये परस्पर उचलल्याप्रकरणी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यात परळी तालुक्यातील नागापूरचे शेतकरी गिरीधर शिवाजी साळुंके यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने तपासणीस अधिकारी संजय हिबारे हे औरंगाबाद येथे पोहोचले. त्यांनी गुट्टे यांच्या औरंगाबाद येथील सातारा परिसरातील घरी पोहोचून शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली. या वेळी गुट्टे यांनीही पोलिसांसमोर हजर राहण्याचे कबूल केले होते.
आपल्या काही मोजक्या समर्थकासह रत्नाकर गुट्टे हे पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यांनी प्रथम पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्यासमोर गुट्टे हजर झाले. हिबारे यांनी त्यांची प्राथमिक चौकशी करून जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. जबाब नोंदविण्याचे काम जवळपास तीन तास चालले. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास गुट्टे हे चौकशीनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर पडले. या वेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना गुट्टे यांनी आपण या कर्ज घोटाळा प्रकरणात दोषी नाहीत. हा सर्व राजकीय षडयंत्राचा भाग आहे. राष्ट्रीयीकृत बँका बिगर कागदपत्राशिवाय कर्ज कसे देऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करून गुट्टे यांनी आपण या पुढेही तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले.
सीआयडीकडे तपास वर्ग होण्याची शक्यता?
पाच जिल्हे व पाच बँकामध्ये ३२८ कोटींचा कर्ज घोटाळा झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती मोठी असल्याने व तपासास काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच हा तपास काही दिवसांत सीआयडीकडे वर्ग होऊ शकतो, अशी शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.