ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याचं आज त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, राज्यात गेल्या दोन वर्षांत झालेल्या घडामोडी पाहता अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे तेही आता काँग्रेसवर दावा ठोकणार का? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विचारला आहे.

फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, “काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या…”

हेही वाचा >> मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपात जाणार?

ही पत्रकार परिषद संपत नाही तोवर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर आलं. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तसं पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलं असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी तत्काळ एक्सवर एक पोस्ट केली आहे.

“अशोक चव्हाण भाजपवासी झाले. विश्वास बसत नाही. कालपर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते.. आज गेले. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली. या दोन्ही नेत्यांनी आपल्याबरोबर पक्षातील अनेक आमदारांना नेत निवडणूक आयोगाकडून कायदेशीररित्या संबंधित पक्षच आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे असाच प्रकार आता काँग्रेसबरोबरही घडणार का? असा उपहास करून संजय राऊतांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे.