नीलेश पवार

नंदुरबार : आदिवासी संस्कृतीमध्ये  महत्त्व असलेल्या होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे. सातपुडा पर्वतरांगांसह जिल्ह्यातील विविध भागांत जवळपास सात दिवस होळीचा उत्साह पाहावयास मिळणार आहे. सर्वाच्या आकर्षणाचे केंद्रिबदू असलेली काठी येथील राजवाडी होळी उत्सव गुरुवारी सायंकाळपासून पहाटेपर्यंत असणार आहे. करोनाकाळात होलिकोत्सव अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळाली नव्हती. यंदा निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आदिवासी बांधवांच्या होळी उत्सवाला नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या आदिवासी बांधवांनी होळीसाठी आपल्या घराकडे परतण्यास सुरुवात केली आहे. होळी उत्सवाला भोंगऱ्या बाजाराने सुरुवात होत असते. यात त्या त्या गावातील मानाच्या लोकांची पारंपरिक वाद्यांच्या घोषात मिरवणूक काढून भोंगऱ्या साजरा केला जातो. धडगाव येथे मानाचा भोंगऱ्या झाला असून मानाच्या भीमसिंग पराडके कुटुंबीयांसह गावचे सर्वच प्रमुख मंडळी यात समाविष्ट झाले होते. याच भोंगऱ्या बाजारातून होळीसाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी केले जाते. त्यामुळे बाजारात मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसत आहे. धडगावप्रमाणेच सातपुडा पर्वतरांगांमध्ये विविध ठिकाणी अशाच पद्धतीने भोंगऱ्या बाजारात गर्दी उसळली आहे.

सातपुडा पर्वतरांगांमध्ये होणाऱ्या विविध ठिकाणच्या होलिकोत्सवांत काठीची राजवाडी होळी सर्वदूर प्रसिद्ध आहे. होळीचा उत्सव पाहण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासह विविध भागांतून हजारो पर्यटक दाखल होत असतात. करोनाकाळात निर्बंधामुळे पर्यटक येऊ शकले नव्हते. ती कसर या वर्षी भरून निघणार आहे. होळीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. खास बाबा बुध्या. ढाणक्या अशा पारंपरिक पेहरावात आदिवासी बांधव होळी साजरा करतात. सातपुडय़ात सात दिवस चालणाऱ्या होळी उत्सवात सहभागी होऊन तिथे पारंपरिक ढोल, बिजरी आणि घुंगरूच्या तालावर ठेका धरून आदिवासी बांधव खास लयबद्ध रीतीने नाचून आपला आनंद व्यक्त करतात. काठीच्या होळीचा मानाचा बांबू आणण्यासाठी ग्रामस्थ गुजरातमध्ये रवाना झाले असून अनवाणी पायी हा मानाचा बांबू काठी येथे आणला जातो.

काठीच्या होळीला अद्याप दोन दिवस बाकी असले तरी देवाची होळी असलेली डाब येथील होळी पेटली आहे. तिथल्या निखाऱ्यानेच सातपुडय़ातील अन्य मानाच्या होळय़ा पेटत असतात. डाबनंतर उडद्या, खांडबारा, खुंटामोडी, कुंडल, काठी, मोलगी, असली, जामली, वडफळी, जमाना, बीलगाव, धडगाव अशा सात दिवस मानाच्या होळय़ा होत असतात. नर्मदा नदीवरील सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांनीदेखील पुनर्वसन वसाहतीमध्ये आपल्या होळी उत्सवाचा आनंद कायम ठेवला आहे. शोभानगर, ठाणा, जीवननगर या पुनर्वसन वसाहतींमध्ये मोठय़ा उत्साहात विविध संघटनांकडून होलिकोत्सव उत्साहात साजरा केला जातो.

गाणे, फेर धरून नाचणे, फाग

आता सातपुडय़ाला यात्रेचे स्वरूप आले आहे. पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधव होळीचे पूजन करतात. आदिवासी महिला-पुरुष ढोल वाजवून होळीभोवती फेर धरून गाणी गातात. आदिवासी महिला-पुरुष मोहाच्या फुलांची दारू (कच्ची दारू) सेवन करून ढोल वाजवून होळीभोवती नाचगाणे करतात. काही लोक सोंगे धारण करतात. होळी सणासाठी फाग (देणगी) मागण्याची पद्धत आहे. आदिवासी महिला- पुरुष आदिवासी पाडय़ांमध्ये घरोघरी जाऊन फाग मागत असतात. जंगलात जाऊन बांबूची अथवा विशिष्ट प्रकारची लाकडे तोडून होळीच्या ठिकाणी जाळतात. त्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते. याच काळात ढोलीला नवीन चामडे चढवतात.

आदिवासी संस्कृतीचे दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खान्देशातील  रावेर तालुक्यापासून तर नंदुरबारच्या धडगाव, तळोद्यापर्यंत आदिवासी बांधवांचा महत्त्वाचा असा सण म्हणजे होळी. दिवाळीला जेवढे महत्त्व असते, तेवढेच आदिवासी बांधवांमध्ये या सणाला महत्त्व आहे. सातपुडय़ाच्या पर्वतरांगेत पावरा, पाडवी, गावित, भिल अशा प्रमुख आदिवासी जमाती आढळतात. आपली अनोखी संस्कृती, चालीरीतींची ओळख या सणातून आदिवासी बांधवांकडून दिली जाते. होळीची चाहूल लागताच त्यांना भोंगऱ्या बाजाराचे वेध लागतात. आदिवासी खेडय़ापाडय़ांमध्ये शेकडो वर्षांपासून होळी सणाला भोंगऱ्या बाजाराची परंपरा चालत आली आहे.