चाळीसगाव ते कन्नडदरम्यान असलेल्या घाटामार्गे वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली असतानाही या घाटाच्या रुंदीकरणाकडे आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा घाट म्हणजे ‘अपघात घाट’ झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ चा हा घाट एक भाग आहे. घाटावरील वाहतूक आणि अपघाताचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातामुळे वित्त व जीवितहानी मोठय़ा प्रमाणावर होत असून वाहतूक कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे.
धुळे, मालेगावसह चाळीसगावहून येणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनधारकांना औरंगाबादकडे जाण्यासाठी कन्नड घाट हा एकमेव मार्ग असून आठ किलोमीटरचा हा घाट वळणा-वळणांचा असल्याने घाटावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. घाटाचे रुंदीकरण, कठडे, संरक्षक भिंती, सूचना फलक, क्रेन, मदत केंद्र, प्राथमिक उपचार यंत्रणा, रुग्णवाहिका यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने शासनाचा नाकर्तेपणा दिसत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. शासनाकडून येणारा निधी किरकोळ डागडुजी करण्यासाठी वापरण्यात येतो. कोटय़वधी रुपयांची कामे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चाळीसगाव यांच्याकडून झाली असूनही हा प्रश्न सुटलेला नाही.
मागील वर्षांत अनेक वाहने दरीत कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सुविधांचा अभाव असल्याने झालेल्या या अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या परप्रांतीयांचा देह नातेवाईकांना मिळण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. तरीदेखील संबंधित विभाग दखल घेत नसल्याचे चित्र आहे. घाटातील अपघातग्रस्तांना वेळीच सुविधा मिळाल्या तर कित्येकांचे प्राण वाचू शकतात. घाटात कोणत्याही क्षुल्लक कारणावरून वाहतूक कोंडी होत असते. काही वेळा तर १८ ते २२ तास घाटामध्ये वाहनांना अडकून पडावे लागते. धुळे-औरंगाबाद हा राज्य महामार्ग असल्याने रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. मात्र २११ क्रमांकाच्या या महामार्गावर टोल वसुली केली जाते. महामार्गावरील होणारे अपघात कमी करण्यासाठी व अपघातग्रस्तांच्या सुरक्षेसाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. घाटामध्ये असलेल्या दोन मोठय़ा वळणावर रस्त्याच्या बाजूला गटारी आणि रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथला होत असल्याचे राज्य महामार्ग पोलिसांचे मत आहे. अनेक वाहने बंद पडतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असतो. काही दिवसांपासून अवजड वाहनांच्या बिघाडामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहेत. काही वाहन पुढे जाण्याच्या प्रयत्नात धोक्याच्या ठिकाणी अडकून पडतात. त्यामुळे कुठल्याही वाहनाला मागे-पुढे जाता येत नाही. अशा परिस्थितीत बंद पडलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी क्रेनला पोहचण्यास बराच वेळ लागतो. सर्व आटापिटा करून घाट उतरून आल्यानंतर खाली थांबणारे महामार्ग पोलीस वाहनधारकांना अडवून कुठल्याही कारणांवरून पैशांची मागणी करत असल्याची तक्रार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansion and repair of kannad ghat ignored by maharashtra government
First published on: 15-03-2014 at 12:33 IST