अहिल्यानगर : ड्रोनच्या सामूहिक वापरामुळे लष्कराच्या रणनीती व सिद्धान्तामध्ये मोठी क्रांती अपेक्षित असल्याचे मत भारतीय सैन्याच्या नगरमधील आर्म्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूलमधील (एसीसी अँड एस) चर्चासत्रात ड्रोन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.भारतीय सैन्याने युद्धभूमीत नावीन्यपूर्ण वापरासाठी स्वार्म (स्वदेशी बनावटीचे) ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या रणनीतीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. एसीसी अँड एस व लष्करी प्रशिक्षण केंद्र (सिमला) यांच्या सहकार्याने आयोजित चर्चासत्रात ‘आराखडा, वर्चस्व व नष्ट करा : संभाव्य लष्करी क्रांती म्हणून सामूहिक ड्रोन युद्ध’ या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते.
आधुनिक युद्धात ड्रोन तंत्रज्ञानाचा परिवर्तनकारी प्रभाव व लष्करी रणनीती, सिद्धान्तामध्ये क्रांती घडवण्यासाठी त्याची क्षमता शोधणे असा चर्चासत्राचा उद्देश होता. या चर्चासत्रात स्वदेशी क्षमता, सामूहिक ड्रोनयुद्धाची आव्हाने आणि संधी, लष्करी रणनीती आणि सिद्धान्तावरील परिणाम, ड्रोनविरोधी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करून ड्रोनची रचना आणि विकास आदी विषयांचा चर्चासत्रात समावेश होता. सामूहिक ड्रोन युद्धामुळे होणाऱ्या संभाव्य लष्करी क्रांतीची व्यापकता या विषयीही चर्चासत्रात आदानप्रदान करण्यात आले.
भारतीय लष्कर, शैक्षणिक संस्था व उद्योगातील ड्रोन तज्ज्ञ उपस्थित होते. या चर्चासत्रात ड्रोन युद्धामुळे घडणाऱ्या संभाव्य लष्करी क्रांतीची, तसेच नवोपक्रम व विकासाच्या संधी ओळखण्यासाठी मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. समारोपाच्या भाषणात आर्म्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूलचे कमांडंट मेजर जनरल विक्रम वर्मा यांनी युद्ध रणनीतीमध्ये स्वार्म ड्रोनचा नावीन्यपूर्ण वापर व स्वदेशी ड्रोन उद्योगाला या चर्चासत्रातून दिशा मिळाल्याचे स्पष्ट केले.
नगर शहराजवळील, मनमाड रस्त्यावरील लष्कराच्या ‘के. के. रेंज’ (खारे कर्जुने, या. नगर) या युद्धसराव क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी लष्कराने स्वदेशी बनावटीच्या ड्रोनचा वापर सुरू केला. ड्रोनच्या झुंडीद्वारे लक्ष्य टिपणे, टेहाळणी करणे, क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण तसेच युद्धतंत्राचा रणनीतीचा अवलंब यासाठी या प्रात्यक्षिकातून सादरीकरण करण्यात आले होते. युद्धामध्ये आता ड्रोनचा अधिकाधिक वापर होऊ लागला आहे. पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई करताना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारतीय लष्कराने ड्रोनचा वापर केला होता. नगरमधील लष्कराच्या यांत्रिकी पायदळ केंद्रास (एमआयआरसी) ड्रोनचे नोडल केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. लष्करी वापराच्या ड्रोन उत्पादनास खाजगी क्षेत्रासही चालना देण्यात आली आहे.