अलिबाग : इरशाळवाडी येथील शोध व बचाव कार्य थांबविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या मृतदेहांचे विघटन सुरू झाल्यामुळे परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरल्याने बचाव पथके आणि आपद्ग्रस्तांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. आतापर्यंत २७ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. या सर्वाना मृत घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मृतांचा आकडा ८४ होणार आहे.

खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीवर १९ जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास दरड कोसळली होती. वाडीतील ३५ घरे दरडीखाली गाडली गेली. २० तारखेला पहाटेपासून मदत व बचाव कार्य सुरू होते. पहिल्या दिवशी १६, दुसऱ्या दिवशी ६, तिसऱ्या दिवशी ५ असे एकूण २७ मृतदेह बचाव पथकांनी बाहेर काढले. रविवारी एकही मृतदेह आढळून आला नाही. शुक्रवारी सापडलेल्या मृतदेहांचे विघटन झाल्याचे दिसून आले होते. तसेच परिसरात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे शनिवारी संध्याकाळनंतर शोधकार्य थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पालकमंत्री सामंत यांनी बचाव पथके, प्रशासकीय यंत्रणा आणि मृतांच्या नातेवाईकांशी यासंदर्भात चर्चा केली. इरशाळवाडीची लोकसंख्या २२८ होती. १४४ जण सध्या निवारा केंद्रात असून बेपत्ता असलेल्या ५७ जणांना मृत घोषित करण्यासंदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. सरकारच्या मंजुरीनंतर सर्वाना मृत घोषित करण्यात येईल. २०२१ मध्ये महाड तालक्यातील तळीये येथे दरड कोसळली होती. या दुर्घटनेतही ८४ जणांचाच मृत्यू झाला होता. तळीये येथे शोधकार्यात ५३ मृतदेह सापडले होते. ३१ जण बेपत्ता होते. नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.

चौक येथे पुनर्वसन

इरशाळवाडीमध्ये एकूण ४३ कुटुंबे राहत होती. यातील २ कुटुंबे पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. अन्य आपद्ग्रस्तांचे सिडकोच्या माध्यमातून चौक येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. सध्या तात्पुरत्या कंटेनर निवारा शेडमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन महिन्यांचे धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तूही उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा सामंत यांनी केली.