केळी निर्यातीमध्ये आर्थिक नुकसानीच्या कारणावरून एका निर्यातदाराला मारहाण करून त्याचे अपहरण केले आणि नंतर त्याच्याकडून चार लाखांची रोकड आणि सोनसाखळी लुटून नेल्याप्रकरणी एका केळी व्यापाऱ्यासह त्याच्या सहा-सात साथीदारांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुप्ता असे मारहाण, अपहरण आणि लूटमार झालेल्या केळी निर्यातदाराचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यात माढा, करमाळा, माळशिरस या भागात निर्यातक्षम केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे असंख्य निर्यातदार या भागात येऊन स्थानिक केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून केळी खरेदी करतात आणि आखाती देशात निर्यात करतात.

गुप्ता यांना माळशिरस तालुक्यातील एका केळी व्यापाऱ्याने निर्यातक्षम केळी पाठविली होती. इराणमध्ये निर्यात झालेली पाच कंटेनर केळी खराब निघाली होती. त्यामुळे आर्थिक फटका बसला होता. हे आर्थिक नुकसान गुप्ता आणि संबंधित केळी व्यापाऱ्याने आणि संबंधित व्यापा-याने सहन करण्याचे ठरले होते.

दरम्यान, केळी निर्यातदार गुप्ता हे टेंभुर्णी येथे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना भेटण्यासाठी आले असता त्यांना संबंधित केळी व्यापाऱ्यासह अन्य सहा-सातजणांनी गाठले. तुझ्याकडे आमचे ३७ लाख रुपये येणे आहेत, असे म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे अपहरण करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुर्डूवाडी रस्त्यावर येऊन पुन्हा दमदाटी करीत त्यांच्याकडून चार लाखांची रोकड आणि सोनसाखळी बळजबरीने लुटण्यात आली. गुप्ता यांच्या दोन सहकाऱ्यांचेही अपहरण करण्यात आले. शेवटी एका ओळखीच्या व्यक्तीने गुप्ता व इतरांची सुटका केली. या पार्श्वभूमीवर गुप्ता व संबंधित केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समझोता करण्याचे ठरले होते. परंतु तोडगा निघाला नाही. त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.