मोर्णासह इतर नदी-नाल्यांना महापूर; असंख्य नागरिकांना सुरक्षास्थळी हलवले

अकोला : जिल्हय़ात मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. मोर्णासह जिल्हय़ातील इतर प्रमुख नदी-नाल्यांना पूर आला. ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शहरातील नदीकाठच्या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. मध्यरात्रीपासूनच असंख्य नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्याचे कार्य सुरू आहे. नुकसानीचे १३ पथकाद्वारे पंचनामा करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला शहरासह जिल्हय़ात बुधवारी रात्रभर धो-धो पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे मोर्णा नदीला महापूर आला. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जुने शहरातील डाबकी मार्ग, शिवसेना वसाहत, बाळापूर नाका आदी भागांमध्ये घरात पाणी शिरले. घरांमध्ये कंबरे एवढे पाणी साचल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. खडकी, कौलखेड, सिंधी कॅम्प परिसरात मोर्णा नदीच्या पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. आ. रणधीर सावरकर यांनी रात्रीपासूनच बचाव कार्य सुरू केले. पुरात अडकलेल्या सुमारे ५० जणांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वीज पुरवठा खंडित झाल्याने बचावकार्याला अडचणी निर्माण झाल्या. पुरात अडकलेल्या नागरिकांना हलवण्यासाठी बोटीचा वापर करण्यात आला. जवाहर नगर, मोठी उमरी, न्यू तापडिया नगर, गोकुळ कॉलनी, मुकुंद नगर आदी भागांनाही फटका बसला आहे. आ. गोवर्धन शर्मा यांनी शिवसेना वसाहत येथील पाच फूट पाण्यात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. किराणा बाजार, खोलेश्वर, कमला नेहरूनगर, गीतानगर, कैलास टेकडी, खेतान नगर आदी पुरग्रस्त भागाची पाहणी करून आ. शर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधला. रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने पूरग्रस्तांसाठी चहा, पाणी, नास्ता व भोजनाची व्यवस्था केली.

दरम्यान, जिल्हय़ातील काटेपूर्णा नदीला देखील पूर आला आहे. पुरामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पुराचे पाणी नदीकाठावरील शेतात शिरल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले. नदीकाठावरील गावातील शेत जमीन पाण्याखाली आली. जिल्हय़ातील अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. काही गावाचा संपर्क देखील तुटला. जिल्हय़ात गेल्या २४ तासांत सरासरी ८०.६ मि.मी. पाऊस झाला असून अकोला तालुक्यात ११६.४ व बार्शीटाकळीमध्ये १६८.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

सर्वोपचार रुग्णालयात पाणी साचले

सर्वोपचार रुग्णालयाततील काही वार्डात पावसाचे पाणी साचल्याने रुग्णांचे चांगलेच हाल झाले. अतिदक्षता विभाग पूर्णत: जलमय झाला होता. पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. वॉर्ड क्रमांक सहा आणि सात मध्येही पावसाचे पाणी गुढघ्या एवढे शिरले होते. सर्वोपचार रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला.

धरणातून पाण्याचा विसर्ग

जिल्हय़ातील विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाळा सुरू असल्याने नेरधामणा धरणाची सर्व द्वारे उचलून ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी पूर पातळी २४४.५० मी असून १२ द्वारातून पाणी वाहत आहे. पूर विसर्ग ५८४७.६६ ‘घमीप्रसें’ने सुरू आहे. दगडपारवा प्रकल्पाचे एक वक्रद्वार २.५० से.मी.ने उघडण्यात आले आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील पातळी ३४४.८२ मी आहे. शहानूर प्रकल्पाचे दोन द्वार १० से.मी.ने उघडण्यात आले आहेत.

२२३७ घरांचे नुकसान

अकोट तालुक्यातील पनोरी येथील ४५ वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरामध्ये वाहून गेला असून त्यांचे शोध कार्य सुरू आहे. जिल्ह्यात २२३७ घरांचे नुकसान झाले असून ६२०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. १५३ जनावरांचे मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली. उगवा गावाच्या शेतात पुरामुळे अडकलेल्या दोन लोकांना एसडीआरएफ पथकाने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच पुरामुळे अडकलेल्या २४ लोकांना पथकाने बाहेर काढले.

रस्त्यांवर पाणी तुंबल्याने चंद्रपूर महापालिकेची पोलखोल ; राजुरा तालुक्यातील शेतकरी वाहून गेला

चंद्रपूर : जिल्हय़ात बुधवारी सकाळपासून सर्वदूर दमदार पावसाला सुरुवात झाल्याने धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे रोवणीच्या कामांना वेग आला आहे. तर, पहिल्याच पावसाने महापालिकेची पोलखोल झाली असून चंद्रपूर शहरात महापौरांच्या वडगाव प्रभागासह मुख्य रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने चंद्रपूरची तुंबई झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तर राजुरा, गडचांदूर, राजुरा, गोवरी मार्ग नाल्याच्या पुरामुळे बंद झाले. जिवती तालुक्यातही अनेक मार्ग बंद झाले.

शहरातील जवळपास सर्वच मुख्य मार्गावर पाणी साचले असून पाण्यातून मार्ग काढणे कठीण होत आहे. टाळेबंदीत शहरातील मुख्य मार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले, सांडपाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांची डागडूजी व निर्मिती करण्यात आली. मात्र एका दिवसाच्या पावसाने महापालिकेची पोलखोल झाली. कस्तुरबा मार्ग, गिरनार चौक, आझाद बगिच्या येथे गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे यावर्षी नाले सफाईचे काम किती गांभीर्याने झाले हे दिसून आले.

महापौरांच्या प्रभागातील मित्र नगर, वडगाव परिसरातील काही भागातही पाणी रस्त्यावर साचले आहे. अनेक घरात नाल्यांचे पाणी शिरले.  महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाचे दोन्ही हेवीवेट नेते वास्तव्यास असलेल्या गिरनार चौक पटेल हायस्कूल परिसरात रस्त्यावर तलाव निर्माण झाल्याचे चित्र असून माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापासून काही पावलांवर असलेल्या भागात दिसणारे हे चित्र महापालिकेच्या बेफिकीरपणाची साक्ष देत आहे.

राजुरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस झाला. असंख्य रस्ते बंद झाले आहेत.

गडचांदूर येथे रस्त्यावरचे पाणी दुकानात शिरले, कोळसा खाणीतही पाणी गेल्याने उत्पादन ठप्प झाले. राजुरा तालुक्यातील भेदोडा येथील शेतकरी चंदू बिल्लावार (५५) हा शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेला. त्याचा मृतदेह साखरवाही येथे मिळाला तर त्याचे वाहन देखील पुरात वाहून गेले. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेऊन योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extreme levels of rainfall over akola district zws
First published on: 23-07-2021 at 00:23 IST