scorecardresearch

“ कशाला उगाच वजन द्यायचं ”, नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांना आवरेना हसू

“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आम्ही देखील सरकारला पाहिजे तेवढं सहकार्य करालाय तयार आहोत, पण…”असं देखील म्हणाले आहेत.

“ कशाला उगाच वजन द्यायचं ”, नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांना आवरेना हसू
(प्रातिनिधिक छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकारपरिषदेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलाताना अगदी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. “ मला असं वाटतं माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे आणि आशिष शेलार यांची प्रतिक्रिया देखील पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा त्याला काही जास्त वजनही नाही. त्यामुळे त्याला उगाच कशाला वजन द्यायचं.” असं फडणवीस म्हणाले, यावेळी त्यांना हसू आवरत नसल्याचंही दिसून आले.

तसेच, यावेळी फडणवीस यांनी राज्यातील एसटी कामगारांच्या सुरू असलेल्या संपावरून महाविकास आघाडी सरकारवर यावेळी निशाणा देखील साधला. “ एसटी महामंडळाच्या संपाच्या संदर्भात सरकारची भूमिका असंवेदनशील आहे. हा संप चिघळू नये असं आम्हाला देखील वाटतं. परंतु सरकार हे केवळ दमनशाहीच्या भरोवशावर दाबून आणि लोकांवर विविध प्रकारची कारवाई करून, हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करेल, तर ते आंदोलन अजुन वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे आणि त्यातून मला असं वाटतं की काहीना काही दिलासा या कर्मचाऱ्यांना सरकारने दिला पाहिजे. एवढ्या आत्महत्या झाल्यानंतरही सरकार जर जागं होत नसेल, तर मला वाटतं हे चुकीचं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आमचे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि आमचे विविध आमदार हे सगळेजण आज आंदोलन करत आहेत. मला असं वाटतं सरकारने याची दखल घेतली पाहिजे. आम्ही देखील सरकारला पाहिजे तेवढं सहकार्य करालाय तयार आहोत, पण मार्ग काढून हा संप मिटवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.” असं फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवलं.

 नवाब मलिक साहेब, आम्हाला तुमची काळजी आहे, मानसिक संतुलन नीट ठेवा – आशिष शेलार

याचबरोबर, राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे या पार्श्वभूमीवर भाजपाच्या तयारीबाबत देखील त्यांनी माहिती दिली. “ विधानपरिषदेची निवडणूक घोषित झालेली आहे. भाजपाची आमची जी राज्य निवडणूक समिती आहे तिची लवकरच आम्ही बैठक घेऊ. या बैठकीत भाजपाचे उमेदवार कोण असतील हे आम्ही ठरवू आणि तशी शिफारस केंद्र व भाजपाला पाठवू. मग आमचं संसदीय मंडळ आणि आमचे अध्यक्ष ते त्याला मान्यता देतील, त्यामुळे नुकतीच घोषणा झाली आहे थोडी वाट बघा.” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

नवाब मलिकांच्या आरोपांना फडणवीसांचं अप्रत्यक्ष प्रत्युत्तर; म्हणाले, “तुम्ही डुकरासोबत कुस्ती…,”

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यानंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. आज पत्रकार परिषद घेत मलिकांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्या अधिकाऱ्याचे जुने संबंध असल्याने ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले? मुन्ना यादव नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो तुमचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही.” असे अनेक सवाल मलिकांनी उपस्थित केले आहेत. तर, या आरोपानंतर ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मलिकांना प्रत्युत्तर दिलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-11-2021 at 15:52 IST

संबंधित बातम्या