सातारा: राज्य उत्पादन शुल्क सातारा व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव (ता. सातारा) येथील महामार्गाच्या उरमोडी नदीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्रित कारवाई करून एक कोटी ९१ लाख रुपयांची गोवा राज्यातील बनावट दारू जप्त केली. याप्रकरणी सचिन विजय जाधव (अळसंद, ता. खानापूर, सांगली) व जमीर हरून पटेल (आगाशिवनगर, मलकापूर, कराड) या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून बनावट दारूचा साठा आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना संबंधित ट्रकमधून बनावट दारू वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या अधिपत्याखाली या पथकास सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.संबंधित ट्रक टप्प्यात आलेला असताना पोलिसांनी ट्रक अडवून त्याची झडती घेतली. त्यावेळी संबंधित इसमांच्या ताब्यात असलेल्या ट्रकमध्ये रॉयल किंग स्पेशल माल्ट व्हिस्की, रॉयल ब्लॅक व्हिस्की अशा वेगवेगळ्या कंपनीच्या ८४ लाख ४१ हजार ४० रुपये किमतीचा विदेशी बनावट दारूचा साठा व साडेसहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा माल आढळून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कारवाईमध्ये एक कोटी ९१ लाख ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बोरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाळके, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आदींनी कारवाईत भाग घेतला होता.