राज्य विधानसभा निवडणुकीची मजमोजणी सुरु असून जवळपास बऱ्याच मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास असलेल्या भाजपा-शिवसेना युतीला किती जागा मिळणार याची उत्सुकता आहे. त्याचसोबत काही मतदारसंघांतील लढती विशेष चर्चेत आल्या. राज्यातील काही कुटुंबांमध्ये रंगलेल्या लढतींचं काय झालं, हे जाणून घेऊयात..

संभाजी पाटील निलंगेकर- अशोक पाटील निलंगेकर


लातूरमधील निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर हे भाजपकडून तर अशोक पाटील निलंगेकर हे काँग्रेसकडून मैदानात आहेत. या काका-पुतण्यांच्या लढतीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी बाजी मारली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार संभाजी पाटील निलंगेकर ४६ हजार ६८६ मतांनी आघाडीवर आहेत.

जयकुमार गोरे- शेखर गोरे


जयकुमार गोरे हे माण या मतदारसंघात भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर शेखर गोरे हे शिवसेनेतून निवडणुकीच्या मैदानात आहे. हे दोघही सख्खे बंधू असून या मतदारसंघात शिवसेना भाजपमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत आहे. पण या मतदारसंघात जयकुमार यांना अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्याकडून आव्हान मिळत आहे. जयकुमार गोरे हे २४ हजार ३९५ मतांनी आघाडीवर आहेत.

पंकजा मुंडे- धनंजय मुंडे</strong>


परळीत बहिण-भावाच्या लढतीत भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा पराभव होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. हे दोघे बहिण भाऊ असले तरीही ही निवडणूक दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे जवळपास ७४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

जयदत्त क्षीरसागर- संदीप क्षीरसागर


बीड विधानसभा मतदारसंघामध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे आमनेसामने उभे राहिले आहेत. जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीवाकडून मैदानात आहेत. या दोघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळतेय. संदीप क्षीरसागर हे ३ हजार ७०७ मतांनी आघाडीवर आहेत.

इंद्रनील नाईक- निलय नाईक


यवतमाळमधील पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये इंद्रनील नाईक आणि निलय नाईक हे दोघं चुलत भाऊ निवडणुकीसाठी आमनेसामने आहेत. भाजपकडून निलय नाईक हे मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात इंद्रनील नाईक हे ४९२१८ मतांनी आघाडीवर आहेत.