सोलापूर : आरटीओ पथकाची कारवाई चुकविण्यासाठी भरधाव निघालेल्या कंटेनरची धडक बसून एका बागायतदार शेतकऱ्याचा हकनाक बळी गेल्याची घटना मोहोळजवळ घडली. या घटनेस आरटीओ पथकाला दोषी धरत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत गावकऱ्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यास घेराव घातला होता. सायंकाळी उशिरापर्यंत तणाव कायम होता.
सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या या अपघातात मोहन दत्तात्रेय आदमाने (वय ५८, रा. शिरापूर, ता. मोहोळ) या बागायतदार शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ते आपल्या दुचाकीने मोहोळ येथून लांबोटीच्या दिशेने येत होते. त्याचवेळी आरटीओ पथकाची मोटार एका कंटेनरचा पाठलाग करीत येत होती. आरटीओ पथकाची मोटार आदमाने यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून संबंधित कंटेनरच्या पुढे जाऊन आडवी थांबली. तेव्हा कंटेनरचालकाने जोराचा ब्रेक दाबताच पाठीमागे असलेल्या आदमाने यांची दुचाकी कंटेनरवर आदळली. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर स्थानिक गावकऱ्यांनी गर्दी करून आरटीओ पथकाला कारणीभूत ठरविले आणि त्या पथकाच्या मोटारीची तोडफोड केली. नंतर या संतप्त गावकऱ्यांच्या जमावाने मोहोळ पोलीस ठाण्यात जाऊन तेथे घेराव घातला. आरटीओ पथकाच्या हलगर्जीपणामुळेच मोहन आदमाने यांचा हकनाक बळी गेल्याचा आरोप करीत, या जमावाने आरटीओ पथकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आदमाने यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. सायंकाळी उशिरापर्यंत हा तिढा कायम होता.
दरम्यान, रात्री या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत आदमाने यांचे पुतणे अर्जुन आदमाने यांच्या तक्रारी नुसार आरटीओ कार्यालयातील अधिकारी राजेश आहुजा आणि शिवाजी सोनटक्के यांच्यासह अन्य कर्मचारी तसेच कंटेनरचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र संतप्त गावक-यांनी आरटीओ अधिकाऱ्यांवरही हल्ला केल्याचा आरोप झाला असून त्याप्रकरणातही रात्री उशिरापर्यंत कारवाई केली जात होती.