कराड : अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनल्याने शेतात तसाच ऊस उभा राहताना सावकाराचाही तगादा राहिल्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या करणाऱ्या हिंगणगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील नामदेव आसाराम जाधव या ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या अस्थी आज सोमवारी कराडच्या प्रीतिसंगमात विसर्जित करण्यात आल्या. या वेळी शेतकरी संघटनाच्या नेत्यांनी कडवट शब्दात राज्य सरकारवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, शेतकरी नेते विनायकराव पाटील, माणिकराव कदम, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांचा अस्थिकलश घेऊन माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी बळिराजाच्या हालअपेष्टा संपू देत, राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळून शेतकरी व कष्टकरी जनतेला न्याय मिळू देत अशी प्रार्थना करण्यात आली. यानंतर कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमात नामदेव जाधव यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विनायकराव पाटील म्हणाले, की नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येचे वास्तव भयंकर आहे. त्याचा ऊस कारखान्याला गेला नाही. त्यामुळे सावकाराच्या कर्जाला आणि प्रापंचिक आर्थिक अडचणीला कंटाळून त्याने उसाचा फड पेटवून तेथीलच झाडाला गळफास घेतला. अतिरिक्त उसासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली. पण त्यांनी दाद घेतली नाही. मग आम्ही जायचे कुणाकडे असा प्रश्न पडला आणि हीच गाऱ्हाणी घेऊन शेतकऱ्यांचे सच्चे नेते व महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधिस्थळी प्रार्थना करण्यासाठी आम्ही आलो आहोत. केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांनी जातिधर्माचे व नाकर्तेपणाचे भोंगे बंद करून शेतकऱ्याच्या दयनीयस्थितीकडे गांभीर्याने पाहावे अशी आमची त्यांना विनंती आहे. नाकर्त्यां राज्यकर्त्यांविरोधात आम्ही येत्या २३ मेला मुंबईत मंत्रालयात एकवटणार असून, तेथे सरकारचे श्राद्ध घालणार आहे. नामदेव जाधवच्या अस्थीचा कलश मंत्रालयात जाऊन फोडणार असल्याचा इशारा विनायकरावांनी दिला.

पंजाबराव पाटील म्हणाले, की यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यावर जुलूम अत्याचार होतोय ही फार मोठी शोकांतिका आहे. सचिन नलवडे म्हणाले, की शेतकऱ्यावर अन्याय करताना या सरकारला लाज वाटली पाहिजे, शेतकऱ्यांचे म्हणून सत्तेत आलेल्या राज्य सरकारचे नामदेव जाधव यांच्या अस्थींबरोबरच विसर्जन व्हायला पाहिजे. या वेळी माणिकराव कदम, शिवाजीराव माने आदींनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer leaders criticize sugarcane grower suicide immersion namdev jadhav bones preeti sangam ysh
First published on: 17-05-2022 at 00:02 IST