सांगली : उसाला पहिला हप्ता पाच हजार रुपये प्रतिटन मिळावा, संपूर्ण कर्जमाफी, वीज बिल मुक्ती झालीच पाहिजे, दुधाला १९८० च्या दर पातळीनुसार डिझेल, पेट्रोल प्रमाणे दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनेची असून, यासाठी क्रांती दिनी १९ ऑगस्ट रोजी डिकसळ (ता. इंदापूर) येथे ऊस व दूध परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सांगलीत बैठक पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती श्री. पाटील यांनी माध्यमांना दिली. पाटील म्हणाले, शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवलीच पाहिजे. संपूर्ण कर्ज, वीज बिल मुक्ती झालीच पाहिजे. उसाला पहिला हप्ता ५००० रु. प्रती टन मिळालाच पाहिजे. दोन साखर व इथेनॉल कारखान्यातील २५ किमी हवाई अंतराची अट रद्द झाली पाहिजे. वन्य प्राणी संरक्षण कायदा व गोवंश हत्या बंदी कायदा रद्द झाला पाहिजे. गाईच्या व म्हैशीच्या दुधाला प्रती लिटर १९८० चा भाव पातळी प्रमाणे डिझेल व पेट्रोल इतका दर मिळाला पाहिजे, या आमच्या मागण्या आहेत.
वन्य प्राण्यांचा त्रास कमी होण्यासाठी ग्रामपंचायतींचे ठराव करून महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्याकडून त्या संबंधित प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतकडून मागणी करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेकडून या ठरावाची प्रत सर्व गावांत दिली जात आहे.
तसेच या बैठकीत कृषी पंपाचे ७ अश्वशक्तीच्या पुढील विज देयक माफ करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सहभागी व्हावे, याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या वन्य प्राण्यांचा त्रास, भटक्या कुत्र्यांचा त्रास सर्वसामान्यांसह नागरिकांना होत आहे, याकडे सरकारने डोळसपणे बघून प्राण्यांच्या प्रजननाचा दर बघून वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा. याबद्दल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष शंकरराव मोहिते, सरचिटणीस धनपाल माळी, महिला आघाडी अध्यक्षा डॉ. प्रगती चव्हाण, आप्पासाहेब पाटील, लक्ष्मण पाटील, केतन जाधव, अरुण पाटील, आबासाहेब वावरे, बलराम बाबर, सर्जेराव देवकर, इसाक सौदागर, बेगमबी शेख, कविता पाटील, श्याम येडेकर, शिवाजी दुर्गाडे, हनुमंत पाटील, चंद्रकांत रास्ते उपस्थित होते.