एकाच चितेवर दोघांना भडाग्नी
होकर्णा येथील वयोवृध्द शेतकरी व्यंकटी लुट्टे (वय ६८) यांच्या डोक्यावर बँकेचे कर्ज होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांचा शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मृत्यू झाला. वडिलांनी घेतलेले शेतीवरील कर्ज मी कसे फेडू या विवंचनेतून नागनाथ व्यंकटी लुट्टे (वय ३८) यांनी घराजवळील डीपी बॉक्समधील विजेची तार हातात धरून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१५ जुलै) सात ते साडेसातच्या सुमारास घडली. रविवारी सकाळी पिता व पुत्रास एकाच चितेवर भडाग्नी देवून अंत्यसंस्कार करण्यात आला.
मुखेडपासून ६ कि. मी. अंतरावर असलेल्या होकर्णा गावात वयोवृध्द शेतकरी व्यंकटी लुट्टे हे शेतीवर आपला संसाराचा गाडा ढकलत होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे ते काढलेले कर्ज फेडता येत नसल्याने मानसिक तणावाखाली होते. व्यंकटी यांच्या नावावर नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जाचे ३० हजारांच्या आसपास देणे असले तरी त्यांच्या पत्नीच्या लक्ष्मीबाईच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सुमारे ८ वर्षांपूर्वी सव्वा लाख रुपये घेतलेल्या व्याजाची रक्कम सुमारे तीन लाखांच्या घरात होती. त्यातच व्यंकटी अर्धागवायूचा आजार जडल्यामुळे ते मागील अनेक दिवसांपासून अंथरुणावरच होते. यामुळे मोठय़ा हलाखीचे दिवस या लुट्टे कुटुंबावर आले होते. व्यंकटी लुट्टे यांचा मुलगा नागनाथ लुट्टे यांच्यावर घर चालवण्यिाची जबाबदारी येवून पडली होती. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आजारी व्यंकटी लुट्टे यांचे निधन झाले. हे वृत्त नागनाथ लुट्टे यांना समजताच त्यांनी घर गाठले व मोठा हंबरडा फोडला. या वेळी गावातील व पाहुण्यांनी नागनाथ यांना सावरण्याचा प्रयत्न केला. या वेळी नागनाथ यांनी माझे वडील तर गेले आता असलेले मोठय़ा रकमेचे कर्ज मी कसे फेडू, असा सवाल करीत थेट घराजवळील विजेच्या तारांना हातात पकडून आत्महत्या केली. या वेळी आजूबाजूच्यांनी लाकडाने नागनाथ लुट्टे यांच्या हातावार लाकूड मारल्यानंतर त्यांचा हात विजेच्या तारेपासून दूर झाला. उपस्थितांना काही समजण्याच्या आतच हा प्रकार घडल्याने या वेळी सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. नागनाथ लुट्टे यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्यांचा रुग्णालयात नेण्याअगोदरच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. रात्री नागनाथ लुट्टे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. आज सकाळी दहाच्या सुमारास होकर्णा येथे पिता-पुत्रास एकाच चितेवर भडाग्नी देवून अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत मुखेड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंत्यसंस्कारांच्या वेळी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि. प. सदस्य संतोष भगवानराव राठोड, राजन देशपांडे, यशवंत बोडके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. मृत व्यंकटी लुट्टे हे शिवसेना विधानसभा संघटक शंकर पाटील लुट्टे यांचे काका होते तर आत्महत्या केलेले नागनाथ लुट्टे हे चुलत भाऊ होत.