शेतकऱ्यांचा किसान लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी याबाबत माहिती दिली आहे. आम्हाला सरकारनं शिष्टमंडळ घेऊन बोलावलं आणि आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. आमच्या ७० टक्के मागण्या महाराष्ट्र सरकारने मान्य केल्यात. बाकीच्या मागण्या विचाराधीन आहेत. इथे आलेल्या लोकांना विश्वासात घेऊन आंदोलन मागे घ्यायचं की नाही हे ठरवलं होतं. बैठकीत जे निर्णय झाले, त्याची प्रत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. मागण्या मान्य झाल्याने मोर्चेकरी समाधानी आहेत. ज्या मागण्या विचाराधीन आहेत त्या येत्या काही दिवसांत नक्कीच पूर्ण होतील, असा विश्वासही शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी व्यक्त केला आहे. ते ठाण्यातील वासिंद येथून बोलत होते.

खरं तर नाशिकहून निघालेला लाँग मार्च ठाण्यात येताच शिंदे सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे विधानभवनात गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटनांमध्ये बैठकही पार पडली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून ठाणे जिल्ह्यातील वासिंद येथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सूत्र हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचंही त्यांना आश्वासन दिलं. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, सात बारा उतारा कोरा केला गेला पाहिजे, नुकसानी नंतर शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मिळाला पाहिजे, अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याची भरपाई मिळाली पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा विराट मोर्चा नाशिकहून ठाण्यात आला होता. आता तो मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.