अकोले : अकोले तालुक्याच्या विकासाचा पाया दिवंगत नेते मधुकरराव पिचड यांनी घातला. तालुक्यात जलमंदिरे उभारली. सहकारी संस्थांची निर्मिती केली. त्यांचा विस्तार केला. अनेकांच्या हाताला काम दिले. निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आज जे पाणी मिळत आहे, त्याचे सर्व श्रेय पिचड यांना आहे. त्यांचा पुतळा नवीन पिढीला प्रेरणा देण्याचे काम करेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

येथील अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचे भूमिपूजन मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दशरथ सावंत होते.

दिवंगत मधुकरराव पिचड यांनी स्वकर्तृत्वावर राज्याच्या राजकारणात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. सत्तेत असो किंवा नसो त्यांनी तालुक्याच्या व आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी सदैव संघर्ष केला. गोवारी हत्याकांडाच्या वेळेला आदिवासी विकास मंत्री या नात्याने नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अलीकडच्या काळात राजकारणात असे उदाहरण दुर्मीळ आहे. दिवंगत पिचड हे अनुभवसंपन्न नेते होते. त्यांच्या व आमच्या कुटुंबाला दोन पिढ्यांचा वारसा आहे. राजकारणात मतभेद असतात पण मनभेद नसतात, असे सांगत पिचड यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

सध्या अनेक लोक जलनायक झाले आहेत. परंतु, निळवंडे धरणाचे खरे जलनायक पिचड आहेत. निळवंडे धरणाचे सर्व श्रेय त्यांचेच आहे, असा टोला मंत्री विखे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत कार्यकारिणी सदस्य शरद देशमुख यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे माजी सचिव यशवंत आभाळे यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया वैद्य व कोमल राठी यांनी केले. अध्यक्ष सुनील दातीर यांनी आभार मानले. संस्थेचे विश्वस्त गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त संपतराव वैद्य, सुरेशराव कोते, मधुकरराव सोनवणे, संस्थेचे सचिव सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत, ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ आदी या वेळी उपस्थित होते.