अडीच हजार हेक्टरवर लागवड; पंधराशे हेक्टरवर काजू लागवड प्रस्तावित

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात मोकळ्या जागेत किंवा घनदाट झालेल्या चिकू लागवडीची तोड करून अनेक शेतकऱ्याने घनदाट पद्धतीने आंबा लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. अशा पद्धतीने जिल्ह्य़ात सुमारे अडीच हजार हेक्टरवर आंबा लागवड यंदाच्या वर्षी झाली असून पंधराशे हेक्टरवर काजू लागवड करण्याचे प्रस्तावित आहे.

पूर्वी दहा मीटर बाय दहा मीटर इतक्या अंतरावर आंब्याची कलमे लावली जात असत. त्या पद्धतीने एका हेक्टरमध्ये सुमारे शंभर झाडांची लागवड होत असे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून आंब्याच्या घन लागवड पद्धतीला अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अशा पद्धतीने हेक्टरी चारशे झाडांची लागवड केली जात आहे. पाच एकरपेक्षा कमी जागा असणाऱ्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या जॉबकार्डच्या माध्यमातून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यास अनुदान देण्यात येते तर पाच हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रफळ शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंब्याची घन लागवड करणे शक्य आहे. अनेक शेतकऱ्यांनी पडीक जमिनीवर तसेच वन विभागाकडून मिळालेल्या वन पट्टय़ांवर लागवड केली असून रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे पंचवीसशे हेक्टरवर यंदा नव्याने आंबा लागवड प्रगतिपथावर असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या दोन्ही पद्धतीने आंबा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जात आहे.

घन आंबा लागवडीचे प्रयोग

पालघर व डहाणू तालुक्यात काही शेतकऱ्यांनी अति घन पद्धतीने आंबा लागवड करण्याचे प्रयोग हाती घेतले आहेत. दर तीन फुटांवर आंब्याचे कलम लावून दोन रांगांमध्ये बारा फूट अंतर ठेवणाऱ्या या लागवडीमध्ये विशिष्ट पद्धतीने छाटणी केली जाते. त्यामुळे आंब्याच्या झाडाला गोलाकार प्राप्त होऊन त्याची उंची मर्यादित राहते. हा प्रयोग इस्राईल पद्धतीच्या लागवडीवर आधारित आहे. आंब्याच्या दोन रांगांमध्ये शेवगाच्या शेंगाचे आंतरपीक घेतल्यास त्यामधून लहान कलमाला एकप्रकारे संरक्षण मिळते.  वाणगाव राईपाडा येथील अशोक जयकर या शेतकऱ्याने अशा पद्धतीने दहा एकरमध्ये साडेसात हजार आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने मशागत केल्यास केसर आंबा निर्यातीकरिता उत्पादित करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

काजूची लागवड

पालघर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांकडून सुमारे दीड लाख काजूच्या रोपांची मागणी आहे. जिल्ह्य़ात रोप उपलब्ध नसल्याने कृषी विभागाने कलमांच्या वाहतुकीसाठी दोन कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधीतून सुमारे पंचवीस लाख रुपये मदत घेतली आहे. या निधीतून रत्नागिरीहून या कलमांची वाहतूक हाती घेतली असून ही कलमे मध्यवर्ती रोपवाटिका दापचरी येथून वितरित केली जाणार आहेत. यामुळे यंदाच्या हंगामामध्ये सुमारे पंधराशे हेक्टरवर काजूची लागवड करण्यात येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.