पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्वेच्या डॉन लेन परिसरात शनिवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या तीन लहान मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी सोडून गेल्याने नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. शनिवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, कैलास परमार (वय ३५) असे आपल्या मुलांची हत्या करुन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो नालासोपाऱ्यातील पुर्वेच्या डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा य़ेथे राहत होता. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने नंदीनी (वय ८), नयना (वय ३) आणि नयन (वय १२) या तीन मुलांची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केली.

कैलास हा लसूण विक्रीचा व्यवसाय करीत होता. पण टाळेबंदीत व्यवसाय बुडल्याने तो घरीच होता. कैलासचे वडील विजू परमार यांनी माहिती दिली की, कैलासची पत्नी दीड महिन्यापासून माहेरी आहे. यामुळे कैलासच आपल्या तीनही मुलांचे पालनपोषण करीत होता. शनिवारी सकाळी त्याने फेसबुकवर आपल्या पत्नीचा फोटो दुसऱ्या व्यक्तीबरोबर पहिला होता. कैलास जेवणासाठी मुलांसह वडिलांकडे जात असे. यामुळे शनिवारी दुपारी त्याने ही बाब वडिलांना सांगितली.

शनिवारी संध्याकाळी ४ वाजता चहापाण्यासाठी वडील त्याला बोलवायला गेले असल्याने त्याने मुलं झोपली आहेत, रात्रीच जेवायला येतो असं सांगितलं. पण आठ वाजले तरी कैलास आला नसल्याने त्याचे वडील पुन्हा त्याला बोलवायला गेले. यावेळी कैलासने दरवाजा उघडला नाही. म्हणून त्यांनी शेजारच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर कैलास आणि त्याची तीनही मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना घरात एक साडी छताला टांगलेली आढळून आली. यामुळे कैलासने मुलांची हत्त्या करुन स्वतःवर वार करण्याआगोदर गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठविले आहेत. तर सध्या पत्नी सोडून गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे पालघर पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितले. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father commits suicide by killing three children aau
First published on: 28-06-2020 at 08:12 IST