पाण्यासाठी कोसो दूर वणवण भटकंती ही माणसाच्याच नशिबी नाही तर वन्यप्राण्यांच्या नशिबीसुद्धा हाच सोस आहे. फरक फक्त एवढाच की माणसाला जीवाचा तेवढा धोका नसतो जेवढा धोका पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांना शिकाऱ्यांचा असतो. डिहायड्रेशनचे बळी ठरलेल्या बिबटय़ाची दोन पिले गोंदिया वनखात्यातील पिपरटोला परिसरात सापडली असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या आईचा काहीच पत्ता नाही. त्यामुळे मादी बिबटय़ाची शिकार झाल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पिपरटोला परिसरात एक सव्वा महिन्याचे बिबटय़ाचे पिलू गावालगत भटकत असल्याचे सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना दिसून आले. त्यांनी वनखात्याला ही माहिती दिली. वनखात्याचे कर्मचारी व मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांची चमू त्याठिकाणी पोहोचली. त्यावेळी बिबटय़ाचे ते पिलू शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे मलूल अवस्थेत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी आजूबाजूला मादी बिबटय़ाची शोधाशोध सुरू केली तेव्हा जंगलातच पहाडाखाली दुसरे पिलू मृतावस्थेत आढळले. शवविच्छेदनानंतर पाणी आणि दूध न मिळाल्याने बिबटय़ाच्या त्या पिलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ज्या परिसरात ही पिले सापडली त्याच परिसरात वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी मचाण उभारली आणि रात्रभर वनमजूर त्या मचाणीवर पाहणी करीत होते. काही आवाज अथवा मादी बिबटच्या खाणाखुणा मिळाल्या तर जिवंत असलेल्या एका पिलाला तिच्यापर्यंत पोहोचवता येईल असा त्यांचा
उद्देश होता.
तत्पूर्वी या परिसरात त्यांनी पाहणीही केली, पण मादी बिबटच्या काहीही खाणाखुणा आढळल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दिवसभर पुन्हा एकदा परिसराची पाहणी करण्यात आली. तेव्हाही मादी बिबटच्या काहीच खाणाखुणा न आढळल्याने या परिसरात पुन्हा एक दुसरी मचाण उभारण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशीसुद्धा मादी बिबटचा काहीही शोध लागला नाही. मादी बिबट जिवंत असती तर तिने नक्कीच पिलांना शोधण्याचा प्रयत्न केला असता. त्यामुळे तिची शिकार झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरीही एकदोन दिवस पुन्हा तिचा शोध घेण्यात येईल आणि मगच त्या पिलाचे काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, मादी बिबटय़ाची ही शोधमोहीम सुरू असतानाच पहाडीला असणाऱ्या गुफांमधून अचानक अस्वल बाहेर आल्याने वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, थोडक्यात जीव वाचवण्यात ते यशस्वी ठरले.
मुळातच या परिसरात पाण्याची कमतरता आहे. या परिसरालगत असलेल्या गावातील शेतकऱ्यांनीही कित्येकदा पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. येथे असलेली शेततळी फुटलेली आहेत. त्यामुळे माणसांनाच नाही तर वन्यप्राण्यांनासुद्धा त्याचा फटका बसत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2015 रोजी प्रकाशित
मादी बिबटय़ा बेपत्ता, पिलांची भटकंती
पाण्यासाठी कोसो दूर वणवण भटकंती ही माणसाच्याच नशिबी नाही तर वन्यप्राण्यांच्या नशिबीसुद्धा हाच सोस आहे.

First published on: 09-05-2015 at 04:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female leopard absconding cubs left roaming