दफनभूमीच्या वादातून मिरज तालुक्यातील मालगाव येथे मुस्लीम समाजाच्या दोन गटात मारामारी होऊन १० जण जखमी झाले. मारामारीत ५ मोटरसायकलची मोडतोड झाली असून घरावर दगडफेकीचा प्रकार घडला आहे. याबाबत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील ११ जणांना सोमवारी अटक केली.
राजू इब्राहीम मुजावर यांच्या चुलत्याचे निधन झाल्यानंतर मृतदेह मालगाव दग्र्यानजीक असणाऱ्या दफनभूमीत नेण्यात आला होता.  त्या वेळी एका गटाने मृतदेहावर दफनभूमीत अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवित खोदलेला खड्डाही मुजविला. यावरून दोन गटात मारामारी झाली.  एकमेकांच्या घरावर दगडफेक करून ५ मोटरसायकलचे नुकसानही करण्यात आले. या हाणामारीत दोन्ही गटाचे १० जण जखमी झाले असून १ लाखाचे मोटरसायकल व घरांचे नुकसान झाले आहे.
याबाबत झाकीरहुसेन अल्लाबक्ष मुजावर आणि राजू इब्राहीम मुजावर या दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. मारामारीत झाकीर मुजावर, इसाक मुजावर, अकबर मुजावर, हारूण मुजावर, शहनवाज मुजावर, जावेद मुजावर, अबुबकर मुजावर, जाकीर मुजावर आणि राजू मुजावर व अब्दुलरजाक मुजावर असे १० जण जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोन्ही गटाच्या ११ जणांना अटक केली आहे.  गावातील तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे.