आघाडीचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या मेळाव्यासाठी तासगावात विनापरवाना डॉल्बीसह मिरवणूक काढून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील यांच्यासह सदोतीस जणांविरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तासगाव येथे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी तालुक्याच्या विविध भागांतून कार्यकत्रे आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मांजर्डे येथील दिनकर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शहरातून डॉल्बीच्या दणदणाटात रॅली काढली होती. या रॅलीसाठी निवडणूक आयोगाची अथवा पोलीस ठाण्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या संदर्भात सामान्य मतदारांनी आक्षेप घेताच पोलिसांनी सदोतीस जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.