कुपवाड्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले आंबोलीचे सुपुत्र पांडुरंग गावडे यांच्यावर मंगळवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गावडे यांचे पार्थिव सोमवारी रात्री विशेष विमानाने दिल्लीहून पणजीला आणण्यात येणार आहे. तेथून गाडीने रात्री ते आंबोलीत आणण्यात येईल आणि मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
कुपवाडय़ातील एका अड्डय़ावर लपून बसलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना यमसदनी धाडण्याचे शूर कृत्य करताना जबर जखमी झालेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान पांडुरंग गावडे (३२) यांना रविवारी वीरमरण प्राप्त झाले होते. गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आंबोली-मुळवंदवाडीतील रहिवासी होते. गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघ्या पाच महिन्यांचा आहे.
श्रीनगर कूपवाडा येथे कंपनी कमांडर म्हणून कार्यरत असलेले गावडे ‘क्विक रिअ‍ॅक्शन टीम’मध्ये कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून कुपवाडा येथे भारतीय सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान पांडुरंग गावडे यांच्यानजीकच झालेल्या हातबॉम्बच्या स्फोटात त्यांच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाली. जबर जखमी अवस्थेतच त्यांना प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच रविवारी पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final rites on pandurang gawde will be performed tomorrow
First published on: 23-05-2016 at 18:03 IST